गरिबांना ५०० रुपयात गॅस सिलेंडर;डॉ.हुलगेश चलवादींचा वादा… — युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत लॅपटॉप देणार…

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादिका 

पुणे, १० नोव्हेंबर २०२४

            वडगाव शेरी मतदार संघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळत आहे. मतदार संघात बहुजन समाज पक्षाचे तगडे आव्हान प्रस्थापित राजकीय पक्षांसमक्ष असल्याने तिहरी लढतीचे चित्र बघायला मिळतेय. मतदारांना ‘१० गॅंरटी’ देत डॉ.हुलगेश चलवादी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘भैय्यांची गॅरंटी’ मुळे मतदार त्यांच्यासोबत अलगत जोडला जात आहे, हे विशेष.

             वाढती महागाई लक्षात घेता आणि याकडे सत्ताधारी ‘महायुती’ आणि विरोधी ‘महाविकास आघाडी’चे होणारे दुर्लक्ष चिंतनीय आहे.त्यामुळे गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी ५०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करवून देवू,अशी हमी डॉ.हुलगेश चलवादी मतदारांना देत आहेत. यासोबतच राज्यातील बेरोजगारीची स्थिती लक्षात घेता त्यांनी रोजगार निर्मितीवरही विशेष भर दिला आहे. अडीच हजार रोजगार निर्मिती करीत युवकांना मोफत लॅपटॉप देण्याचा वादा ते मतदारांना करीत आहे. नवीन शाळा आणि महाविद्यालय उभारणीचा डॉ.चलवादीचा वादा त्यांची शैक्षणिक क्रांतीसाठी असलेली धडपड आणि कटिबद्धतेचे प्रतिक आहे.

          डॉ.चलवादीच्या या १० ‘गॅरंटी’ची चर्चा त्यामुळे मतदार संघात विशेष लक्षणीय ठरत आहे. वाढती महागाईसोबतच आरोग्यसुविधावरील खर्चही वाढला आहे. अशात सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी ५ लाखांचा मोफत आरोग्य विमा देण्याची घोषणा डॉ.चलवादींनी केली आहे.दरवर्षी यात वाढत्या महागाईनूसार वाढ केली जाईल. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी एक लाख झाडे लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

          मातृशक्तीच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, नागरिकांना २४ तास मोफत पाणी मिळवून देण्याची हमी देखील डॉ.चलवादी प्रचार अभियानादरम्यान देत आहेत. मतदार संघात असलेल्या विविध समाजांना त्यांच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी बहुद्देशिय सभागृह उभारून ‘विचारपीठ’ उपलब्ध करवून देण्याची डॉ.चलवादींची हमी देखील विशेष चर्चेची बाब ठरत आहे.