आळंदीत आषाढी एकादशीच्या पुर्वी इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली.. — आमदार मोहिते यांनी सुध्दा इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत दर्शविला नाराजी…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : आषाढी एकादशी निमित्त जसं पंढरपूर येथे वारकरी भाविकांची गर्दी असते त्याच प्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आळंदी येथे हजारो वारकरी आणि भाविक आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेक संतांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरपूर झाल्यानंतर आळंदी व देहूला येत असतात, त्यामुळे येणारे भाविक पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी जात असतात, परंतु येणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा केमिकल युक्त फेसाळलेल्या पाण्यातच स्नान करावे लागेत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी सरकारला लवकरात लवकर बुध्दी द्यावी अशी प्रार्थना वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी केली आहे.

 

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली असून पिंपरी चिंचवडची घानीचा आळंदीकरांना त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदुषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर याबाबत सरकारने लक्ष घालावे अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.