नागपूर :-
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चिरंजीव असलेल्या संकेत ने पाच वाहनांना ढोकत अपघात केला असल्याचे गंभीर प्रकरण पुढे आले आहे.अपघात केल्यानंतर संकेत हा अपघात स्थळावरून पळून गेला असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर नगरीत रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर कायदा आणि सुव्यवस्थे बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले.
पैसा आणि सत्तेचा माजाने नागपूरच्या रस्त्यावर धिंगाणा घातला.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने एकामागोमाग पाच वाहनांना उडवले.या भीषण अपघातात दोन तरुण जखमी झाले असून वाहनांचा चेंदामेंदा झाला.
या घटनेने भेदरलेला संकेत आणि त्याचा एक मित्र पळून गेला तर अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली.हे प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी ऑडीची नंबर प्लेट हटवण्यात आली. तसेच पोलिसांनी ड्रायव्हरचीही अदलाबदली केल्याची चर्चा आहे.
****
संकेत बावनकुळे आणि त्याचे तीन मित्र या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या धरमपेठेतील लाहोरी येथे गेले होते.तिथे त्यांनी जेवण केले.मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चौघेही एमएच 40-सीवाय-4040 या क्रमांकाच्या ऑडी कारने रामदास पेठकडे आले.
यादरम्यान ऑडीने जितेंद्र सोनकांबळे यांच्या एमएच-31- ईके-3939 या क्रमांकाच्या कारला धडक दिली.त्यानंतर एका मोपेडला ठोकले.त्यावरील दोन तरुण या धडकेत जखमी झाले.
ऑडीचा वेग इतका होता की तिने मानकापूरच्या दिशेने जाणाऱ्या अन्य तीन वाहनांनाही धडक दिली.त्यात एमएच-49-झेड-8637 या क्रमांकाच्या कारचा समावेश आहे.त्यानंतर एका पोलो कारलाही जोरदार धडक दिली. पोलो कारच्या चालकाने ऑडीचा पाठलाग करून माणकापूर पुलावर थांबवण्यास आॅडी भाग पाडले.
माणकापूर पुलालावर ऑडी थांबताच संकेत आणि त्याचा एक मित्र कारमधून बाहेर उडी टाकून पळून गेले.कारमधील अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमवार या दोघांना पकडून तहसील पोलीस ठाण्यात नेण्यात आले.नंतर त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अर्जुन हा अभियंता असून सरकारी कंत्राटदार आहे,तर रोहित याचा ट्रान्सफॉर्मरचा व्यवसाय आहे.जितेंद्र सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद केला.
ऑडी कारमधील चार लोक धरमपेठ मधील एका बीअर बारमधून बाहेर पडले होते.त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्यातून दिले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांना नंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
ऑडी कार कुठून निघाली आणि वाहनांना उडवत धरमपेठपासून माणकापूरपर्यंत कशी आली त्याचे सीसीटीव्ही मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
घटना घडली तेव्हा ऑडीमध्ये चार तरुण होते,असे तक्रारदार सोनकांबळे यांचे म्हणणे आहे.चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.परंतु वरून दबाव आल्याने पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी ऑडीची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली आणि ड्रायव्हरचीही अदलाबदली करण्यात आली असे समोर आले आहे.संकेत हा गाडी चालवत होता असे सोनकांबळे यांनी सांगूनही अर्जुन गाडी चालवत होता,असा दावा पोलीस करीत आहेत.
*****
ती ऑडी माझ्या मुलाचीच..
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती ऑडी आपला मुलगा संकेत याचीच असल्याची कबुली दिली.माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे.या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी,कुणालाही वेगळा न्याय लावू नये,जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत,त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,असे बावनकुळे म्हणाले.
मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही,असा दावा करतानाच,न्याय सर्वांना सारखा असायला हवा,मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो,असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
***
कायदा वेगळा का?
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटने संदर्भात द्विट करून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे.’रविवारी रात्री नागपूरच्या रामदास पेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्या.मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे.
मात्र,आश्चर्य असे की आरटीओने गाडीचा नंबर न नोंदवता ती गाडी सोडून दिली.चंद्रशेखर बावनकुळेंसाठी कायदा वेगळा का?’ असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.