दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभागीय
पुणे : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा हल्ल्यासारख्या विविध प्रकारच्या घटनांची शक्यता असून देशवासीय म्हणून आपण सावध राहिले पाहिजे’, असा इशारा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी दुपारी पुण्यात दिला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय ‘गांधी दर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मलिक यांनी राज्यभरातून आलेल्या शिबिरार्थींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला.
‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय लष्कराच्या बसवर बॉम्ब हल्ला झाला होता आणि ४० जवान मृत्युमुखी पडले होते.त्यानंतर बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे सांगून निवडणूक पार पडली होती. पुलवामा हल्ल्यामागचे सत्य आपण सर्वानी शोधले पाहिजे. देशात भ्रष्टाचार वाढला असून त्याविरोधात लढले पाहिजे’,असेही ते छोटेखानी संदेशात म्हणाले. हे बोलताना मलिक म्हणाले, ‘माझे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. पण मला माझी काळजी नाही .मी जिवंत असेपर्यंत यांच्या खोटेपणा आणि अन्यायाविरुद्ध लढणार आहे. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या माध्यमातून डॉ कुमार सप्तर्षी हे जनजागृती घडवून आणत असून मला त्याबद्दल आदर आहे’, असेही मलिक यांनी सांगितले.
हे शिबिर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे उत्साहात पार पडले. ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ मालिकेतील हे सहावे शिबीर होते. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार(गांधी समजून घेताना), डॉ.कुमार सप्तर्षी (सत्याग्रहशास्त्र), ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (सावरकर तुलना) यांनी मार्गदर्शन केले. डॉ.उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,ज्ञानेश्वर मोळक, मिलिंद गायकवाड, जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, संदीप बर्वे, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गांधी विचारांचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी जुन्या पिढीवर नको : सुरेश द्वादशीवार
सुरेश द्वादशीवार म्हणाले, ‘गांधीवाद्यांनी समाजाला गांधी नीट समजावून सांगितले नाहीत. गांधी विचारांचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी जुन्या पिढीवर न देता नव्या पिढीने ही जबाबदारी घेतली पाहिजे. सामान्य माणसांनी पुढे येऊन गांधींचे विचार समजून घेण्याची गरज आहे.देशात देव आणि धर्म यांचा वापर राजकारणासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणासाठीच देव आणि धर्म शिल्लक आहे का ? असा प्रश्न पडतो. आजच्या सत्ताधाऱ्याना भीती वाटते म्हणून ते वेगवेगळे कायदे करतात. देशामध्ये एकेका जातीचे पक्ष निर्माण झाले असल्याने अशा ठिकाणी महात्मा गांधी कसे समजणार. देशात गांधींचे पुतळे पुजले जात आहे मात्र विचार पुजले जात नसल्याची स्थिती आहे. देशाचे विभाजन झाले, याच्याशी गांधीचा सबंध नाही. कारण त्यांना समाजातील फूट मान्य नव्हती. टीकाकार समजून घेतल्याशिवाय गांधी समजणार नाही. गांधींच्या मागे दलीत आणि मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणावर होता. गांधी देशातील सर्वांचे नेते होते. गांधींनी विचार लिहून ठेवले नाही. कामातून आदर्श ठेवला. गांधींचे अनुयायी खूप आहेत पण ते एकत्र नाहीत. कारण त्यांनी गांधींचे वेगवेगळे विचार स्विकारले. दुर्जनाना काही गोष्टी लवकर समजतात, सज्जनाना मात्र लवकर समजत नाही’.
सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ‘पुलवामा बाबत आधी अलर्ट मिळाले होते, मात्र जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. जैश ए महमद चे अतिरेकी आढळले तरी पकडले नव्हती. हा मोठा कट असून तो उघडकीस आणला पाहिजे’. भारत जोडो यात्रेत पूर्ण वेळ सहभागी झालेल्या सरफराज काझी यांचा सत्कार या शिबिरात करण्यात आला.