रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या चिमूर तालुक्यातील सुभाष डहारे,बाळू झोडे,योगेश सहारे यांना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी शहिद बालाजी रायपुरकर विरता पुरस्कार ऑगस्ट क्रांतीदिनी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्था सभागृहात आयोजित समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, ग्रंथ,शाल,१००० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड भूपेश पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक प्रल्हाद बोरकर,राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,पत्रकार जितेंद्र सहारे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
माणुसकी लयाला जात असण्याच्या सध्याच्या युगात आपला जीव धोक्यात घालून एखाद्याचे प्राण वाचवणे ही खूप मोठी गोष्ट आहे.एकमेकांचा द्वेष करण्याच्या या काळात पुरात अडकलेल्यांचे जीव वाचवून माणुसकी जिवंत असल्याचे हे चिन्ह आहे. अशा माणुसकीसाठी जगणाऱ्या व्यक्तींना शहिद बालाजी रायपुरकर पुरस्कार प्रदान करताना सामान्यांच्या असामान्यत्वाला सलाम करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भूपेश पाटील यांनी केले.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नेरी सिरपूर मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाच्या पाण्याची तीव्रता लक्षात न आल्याने चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी पाण्याच्या प्रवाहात मोटारसायकलसह वाहून गेले.जीव वाचवण्यासाठी दोघेही टाहो फोडत होते. पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने अनेकांची हिम्मत झाली नाही.
अशात सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोघांनी मोठया हिंमतीने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुरात वाहून गेलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोन जिगरबाज व्यक्तींच्या हिंमतीमुळे त्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना बोथली येथील योगेश सहारे, राजू बारेकर,रुपेश चौखे, विनोद चौखे या युवकांनी पुरातून बाहेर काढले.त्यांनाही या समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सत्काराला प्रातिनिधिक स्वरूपात योगेश सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समारंभाचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले.आभार कैलास बोरकर यांनी मानले.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.