नाट्यश्री चे अविस्मरणीय कवी संमेलन.

ऋषी सहारे

संपादक

       स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ कवी डॉ. देवेंद्र मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध नाटककार व कवी भिमानंद मेश्राम यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कवयित्री कुसुमताई आलाम, पांडुरंग घोटेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

      या कवि संमेलनात झाडीपट्टीतील एकूण बेचाळीस कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. सामाजिक आशयाच्या, विषयाच्या व चळवळीच्या विविध कवितांनी संमेलनात चांगली रंगत आणली.

       संगीता ठलाल या कवयित्रीच्या ‘तुझी आई मी तुझी जननी’ या कवितेने संमेलनाची सुरुवात झाली तर नंदकिशोर नैताम या आदिवासी कविच्या ‘पोवरी’ या कवितेने पहिल्या आदिवासी डॉक्टर झालेल्या आदिवासी युवतीची ओळख करून दिली. नंदकिशोर मसराम या कवीने डफाच्या थापेवर ‘लेक सासरी चालली’ ही कविता गावून रसिकांची वाहवा मिळवली, तर सिद्धार्थ गोवर्धन यांच्या ‘मी जिथे राहतो ती दलितांची वस्ती आहे’ या कवितेने संमेलनास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. संगीता रामटेके यांची ‘सुशिक्षित बेरोजगार’ रूपाली मस्के यांची ‘चुकभुल’, विजय शेंडे यांची ‘माय माझी माय’, मिलिंद खोब्रागडे यांची ‘धागा मराठीचा’, सोनू आलाम यांची ‘मी युवा आहे’, राजरत्न पेटकर यांची ‘जबाबदार’, उपेंद्र रोहनकर यांची ‘पोरगी पावाले गेलतो’ ही झाडीबोलीतील कविता, गजानन गेडाम यांची ‘ती लाजताना’, कुसुमताई आलाम यांची ‘गुरुजींनी पाठीवर ठेवला हात’, देवेंद्र मुनघाटे यांची लोकप्रतिनिधींचे चिमटे घेणारी ‘वाट’, तर प्रमुख अतिथी भीमानंद मेश्राम यांच्या ‘गांधीजी स्वप्नात आले’ या आशयगर्भ कवितेने रसिक भारावून गेले. 

        ‘नाट्यश्री’ चे कवि संमेलन एक पर्वणी असते. दर्जेदार कवितांचा आस्वाद या संमेलनातून घ्यायला मिळतो. समाजाला दिशा देणारे हे कवीसंमेलन आहे’ असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष देवेंद्र मुनघाटे यांनी काढले. ‘आदिवासी व मागासवर्गीयांच्या व्यथा मांडणारे कवी संमेलन आहे’ असे मत आदिवासी साहित्यिका कुसुमताई आलाम यांनी मांडले.

या कवी संमेलनात संगीता ठलाल, दिलीप भैसारे, मंदाकिनी चरडे, नंदकिशोर नैताम, सुजाता अवचट, नंदकिशोर मसराम, पप्पू सिन्हा रूपाली मस्के, तुळशीराम उंदीरवाडे, संगीता रामटेके, प्रदीपकुमार साखरे, भिमानंद मेश्राम, विजय शेंडे, निळकंठ रोहनकर, मिलिंद खोब्रागडे, सोनू आलाम, सिद्धार्थ गोवर्धन, पुरुषोत्तम ठाकरे, राजरत्न पेठकर, उपेंद्र रोहनकर, डॉ. देवेंद्र मुनघाटे, गजानन गेडाम, खुशाल म्हशाखेत्री, खेमराज हस्ते, वसंत चापले, अहिंसक दहिवले, राहुल शेंडे, स्वप्निल बांबोळे, विनायक जांपलवार, केवळ बगमारे, वामनदादा गेडाम, वर्षा राजगडे, जितेंद्र रायपुरे, विजया पोगडे, महेंद्र ठाकरे इ. कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या.

        कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेंद्र गोहणे यांनी केले. सोबतच प्रत्येक कवींचा थोडक्यात साहित्यिक परिचय करून दिला. सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र व झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.     

             कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. अरुण बुरे, गुणवंत शेंडे, चुडाराम बल्हारपुरे(संचालक), सोनू आलाम व दै. देशोन्नतीचे उपसंपादक नरेश बावणे यांनी विशेष मेहनत घेतली.