दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : डॉ.रामचंद्र देखणे हे उत्तम लेखक, साहित्यिक, कलावंत तसेच वारकरी होते. त्यांच्या नावे कार्यक्षम, विचारवंत, बुद्धिमान व्यक्तींना पुरस्कार दिला जात आहे ही गौरवाची बाब आहे. साहित्य, कला, भक्ती, वारकरी पंथाची सेवा हाच खरा भावार्थ आहे, असे प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी केले.
संत विचार प्रबोधिनी आणि डॉ.रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे ’वै.डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024′ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ’वै.डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024, कीर्तनसेवा पुरस्कार’ हभप अमृताश्रम स्वामी महाराज यांना तर ’वै.डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर 2024, लोककला सेवा पुरस्कार’ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ.देगलूरकर बोलत होते. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वेदांत सत्संग समितीचे गुरुवर्य डॉ.नारायण महाराज जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मकरंद टिल्लू तसेच डॉ.रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भावार्थ देखणे, डॉ.पूजा देखणे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.नारायण महाराज जाधव म्हणाले, डॉ.देखणे यांनी आपल्याला वेदांतांचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले व सात्विक धैर्य दिले. त्यांच्या नावे दिलेल्या पुरस्काराने आध्यात्माचे जतन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देताना आचार्य मावळे म्हणाले, वारकरी कुटुंबात जन्म झाल्याचे आज सार्थक झाले. डॉ. देखणे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे शारदेच्या दारात शाहिराला मिळालेले स्थान आहे. कीर्तन व शाहिरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज मिळालेल्या गौरवाच्या रक्कमेत भर घालून पुरस्काराची रक्कम शाहिरी कला प्रकार जीवंत राहण्यासाठी स्थापन केलेल्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीस देणगी म्हणून देत आहे.
प्रास्ताविकात डॉ.भावार्थ देखणे यांनी पुरस्कारामागील भावना विशद केली. डॉ.भावार्थ देखणे यांनी लिहिलेल्या डॉ.रामचंद्र देखणे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणाऱ्या लेखाचे तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मानपत्राचे वाचन डॉ.पूजा देखणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले तर आभार पद्मश्री जोशी यांनी मानले.