चिखलदरा तालुक्यातंर्गत मेळघाट क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ढासळला.. — शिक्षकांना आशीर्वाद कुणाचा? — लक्ष कोण देणार?

अबोदनागो सुभाष चव्हाण

चिखलदरा तालुका प्रतिनिधि 

         दखल न्यूज भारत

       चिखलदरा तालुक्यातंर्गत मेळघाट परिसरातील,(ग्रामीण भागात) पालक वर्गाना आता शिक्षणाचे महत्व कळाले असुन या भागातील शाळेत परिस्थितीला अनुसरून सर्व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

          असे असताना चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ केन्द्र व आवागड केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने विद्यार्थांचे भयंकर शैक्षणिक नुकसान होत आहे.

          काटकुंभ केंद्राचे केंद्र प्रमुख,भाग शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी याच्या ढिसाळ नियोजनामुळे या दोन्ही केंद्रातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.

        केंद्र प्रमुखाच्या आशीर्वादाने शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट आहे.शाळेच्या स्थानीक ठिकाणी शिक्षक राहातं नसल्याने ते परतवाडा,मोर्शी, वरुड,अमरावती,अंजनगाव, दर्यापूर येथून दररोज अपडाऊन करीत असल्याचे चित्र आहे.

         याचबरोबर अनेक दांडी बहादूर शिक्षक शाळेला दांडी मारत असून आदिवासी बाहुल्य क्षेत्रातील अनभिज्ञ नागरिकांचा फायदा घेत असल्याचे पुढे आले आहे.

     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मेळघाट क्षेत्रातंर्गत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी ओरड शिक्षण प्रेमींची,स्थानिक नागरिकांची व पालक वर्गाची आहे.

        मेळघाटात ज्ञानाचे धडे देणारे गुरुजी आपल्या कर्तव्यात कसुर करीत असल्याने विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया कमजोर होत आहे.

        त्यामुळे मेळघाट भागातील विद्यार्थी हे शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडताना दिसून येत आहे.

        मेळघाट अंतर्गत काटकुंभ केन्द्रातील व आवागड केंद्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला असताना गटशिक्षणाधिकारी,भागशिक्षणाधिकारी,केंद्र प्रमुख करतात तरी काय? हा ज्वलंत प्रश्न आवासून उपस्थित होतो आहे.

         शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करावी व मेळघाट भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत,”दखल न्युज भारत वेब पोर्टल चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण यांच्या सोबत चर्चा करताना शिक्षण प्रेमी,नागरिक व पालक वर्गांचे आहे.

         सदर दोन्ही केंद्रातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना धड मराठी जोडा अक्षरे वाचता येत नसल्याने जिल्हा परिषद शाळा अंतर्गत प्राथमिक शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे.

         मेळघाट अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या ढासळणाऱ्या शैक्षणिक बाबीकडे,अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार काय? याकडे पालक वर्गांचे,शिक्षण प्रेमींचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.