दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर या भावनेने राज्यभरातून आलेल्या असंख्य भाविकांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. यंदा मात्र कार्तिकी यात्रेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान पूजेसाठी बंद ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या सभासदांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते दिडपर्यंत संजीवन समाधीवर पवमान अभिषेक ११ ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विधीवत करण्यात आला.
सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले.
कार्तिकी एकादशीचे मानाचे वारकरी म्हणून शेषराव सोपान आडे वय (60), गंगुबाई शेषराव आडे वय(55) गाव परतवाडी तालुका परतूर जिल्हा जालना यांना महापूजेचा मान मिळाला. 2021 ला सुद्धा माऊलींच्या महापूजेचा त्यांना मान मिळाला होता. दुसऱ्यांदा मान मिळाल्याने ते म्हणाले ही माऊलींची कृपा आहे. 7 तास ते दर्शन रांगेत उभे होते. व्यवसाय शेती आहे. सपत्निक आषाढी वारी कार्तिकी यात्रा 25 ते 30 वर्ष करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी दांपत्य म्हणाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे आणि माऊलींची कृपा असल्याने असा योग्य घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे त्यांनी माऊलींकडे मागितले.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, हभप भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, ॲड.राजेश उमाप यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळप्रसाद देण्यात आला. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्य महाराज लोंढे, डि.डि.भोसले पाटील, सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले तसेच प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्त दुपारी बारा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची संपूर्ण आळंदी नगर प्रदक्षिणा होणार आहे, तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या सुध्दा उद्या नगर प्रदक्षिणा घालणार आहे, पहाटे दोन वाजल्यापासून वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत दिसत आहे. यावेळी आळंदी शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.