
पूर्वी माणसात जीव आणि जिवाभावाचा माणूस होता. त्यामुळे माणुसकी जिवंत होती. आज ही माणुसकी जनावरांनी स्वीकारली आणि जनावरं माणसं झाली आणि माणूस जनावर झाला.!
पूर्वी एकमेकांना नातेवाईक भेटले तर जिव्हाळ्याने चौकशी करत असत की आई, वडील,मूले सर्व बरे आहेत ना, मुलं काय करतात वगैरे वगैरे जिव्हाळ्याने आस्थेवाईक चौकशी होत असे.एकमेकांच्या सुख दुःखात हृदयाने सहभागी होऊन आनंदाची देवाण घेवाण होत असे.कधी कधी हे प्रेम जाती, धर्माची,रक्ताची बंधने तोडून आरपार जात होती.आणि एकंदरीत माणूस माणसासाठी माणुसकी जिवंत ठेऊन माणूस म्हणूनच जगणे आणि मरणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय समजून जगत आलेला होता. आजही काही ( अगदी अल्पशा ) प्रमाणात ग्रामीण भागात ही माणुसकी जिवंत असल्याचे चिन्ह आहेत.
“परंतू,आज आम्ही एकमेकांना जर समोरासमोर भेटलो तेवढ्यापुरते गोड गोड बोलून लगेच त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. केलीच थोडीशी पुढे जाऊन चौकशी तर म्हणतो राहायला कुठे आहेत? मुलाची लग्ने झाली का? किती शिक्षण झाले? जॉब काय करतात? पर्मनंट झालेत का? जॉब सरकारी आहे की खाजगी? पगार किती मिळतो? स्वतःचं घर आहे की भाड्याचं? वरील प्रश्नांची उत्तरे सकारात्मक मिळाली तर मग आपल्या स्वताच्या किंवा नातेवाईकांच्या मुलामुलींसाठी स्थळाच्या पाहणीसाठी चौकशी करतो.( म्हणजे इथेही माणुसकी हरवलेला स्वार्थच पाहतो ).
“दोन जेष्ठ नागरिक जरी एकमेकांना भेटले तरी त्यांची प्राथमिक चौकशी म्हणजे ही की थोडीशी तब्येतीची विचारपूस करणे. त्यानंतर पेन्शन कीती मिळते? पेन्शन जमा झाले का? या दुखण्यासाठी हा दवाखाना बरा,हा डॉक्टर बरा.माझे तीन बंगले किंवा घरे आहेत.मुलांना, मुलींना, सुनांना मिळून घरात 5 लाख रुपये दरमहा घरात येतात.
या वरील प्रकारच्या चौकशीत कुठेही माणुसकीचा साधा वासही नसतो.
कारण अनितीच्या मार्गाने जीवनात आलेल्या पैश्यामुळे जीवनात खरे सुख मिळू शकत नाही.!
परंतू ज्यांनी नैतिकता जपून पैसा केवळ विनिमयाचे साधन आणि माध्यम म्हणून त्या पैश्याकडे बघितले ती माणसं आजही खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुखी आहेत.
यासाठीच तर खऱ्या शिक्षणाची निर्मिती झालेली होती.!
हेच आम्ही विसरलो!
आणि शिक्षण हे पॆसे कमविण्यासाठीच असते असा गैरसमज करून घेऊन कोरोनाच्या गतीने आम्ही धावत सुटलो.माणुसकी जिव्हाळा,एकमेकांच्या सुख- दुःखात सामील होण्याची नाटके केवळ शब्दातून आम्ही व्यक्त होतो. परंतू तशी कृती करायची म्हटलं तरी आम्हाला बिगर बी.पी.चा घाम फुटतो.
असा वरील प्रकारचा माणसात बदल का झाला? बरं केवळ आमच्याच दरिद्री देशात का झाला? इतर सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या देशात याचे प्रमाण खूप अल्प आहेत असं का?
तर याचे मुख्य कारण आमच्या देशावर पाऊणे चार हजार वर्षांपूर्वी साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनितीचे झालेले कुसांस्कृतिक आक्रमण होय.!
या आक्रमणाला कायमस्वरूपी थोपविण्याचे काम तथागत भगवान बुद्धानी धम्माचे संशोधन करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान क्रांती करून केले. त्याचप्रमाणे याच विचारावर आधारित आपल्या देशातील आणि जागतिक पातळीवर अनेक ज्ञात अज्ञात वंचित आणि उपेक्षित महापुरुष आणि तत्ववेत्त्यांनी केले.
परंतू ,कुटनीतीचा प्रभाव त्यापेक्षाही प्रभावी ठरला.कारण कुटनीतीत त्याग,संघर्ष,समर्पण,नैतिकता,कर्तव्य या माणुसकीच्या तत्वाचा समावेश नसतो.त्यामध्ये केवळ दुसऱ्याच्या अज्ञानाचा लाभ स्वतःच्या हुशारीने कसा घेता येईल आणि दुसऱ्यांना कसं गुलामीत ठेवता येईल हीच कूसंस्कृती त्यात दडलेली असते. शिवाय मादक पदार्थाचे सेवन केल्याने ही कुसंस्कृती अधिक अविष्कारीत होते.म्हणून आज 2024 च्या काळात आमच्या देशातील सर्वसामान्य जनता, समाज,नागरिक, सरकार ( केंद्र व राज्य ) सर्वात जास्त मादक पदार्थाची निर्मिती करून जनतेला सदविचारी न बनू देण्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.!
म्हणूनच या कुटनीतीने अती उच टोक गाठल्यामुळे आम्ही ( जनता ) आता केवळ येन केन प्रकारे, कोणत्याही मार्गाने, अनितीला जवळ करून प्रसंगी एकमेकांचे खून करून पैसा,संपत्ती हडपणे हेच अंतिम ध्येय समजून समाजात अनितीचा शिरकाव झालेला आहे.!
म्हणूनच आमचा देश एका भयानक अशा उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे.
शिवाय अशाही काळात बोटावर मोजण्याइतक्या माणसाने पूर्वीची माणुसकी टिकविण्यासाठी आचरणातून प्रयत्न करत असेल तर त्याला हीच जनता.
महामूर्ख..
म्हणून संबोधते,त्याला सुद्धा त्याचे काहीही वाईट किंवा दुःख वाटत नसते. कारण त्याला ठाऊक आहे की खरा सुखी कोन आहे?
म्हणून जीवनात खरे सुखी जीवन जगायचे असेल तर पैसा केवळ विनिमयाचे माध्यम एवढाच अर्थ समजा. आणि माणसं जोडत माणुसकी टिकवा हाच या सर्वावर उपाय असेल.
अन्यथा पैश्यानेच सर्व काही होत आहे रे आधी पैसेच पाहिजे. असं म्हणून जगाल तर शारीरिक आणि मानसिक दुःख जिवंतपणीच येऊन आपले मरण आपल्या डोळ्याने बघावे लागेल.तेंव्हा कुठे आपण दानव न बनता मानव बनू….