पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज- शहरात ठिक-ठिकाणी मुख्य रस्त्यावर, वार्डात दिवस-रात्र मोकाट जनावरांचे बस्तान असते. त्यामुळे नागरिकांना अवागमन करण्यास व वाहनांना अडथळा निर्माण होते. प्रसंगी यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्यासाठी पालिकेला वारंवार सुचना देऊनही त्यांचे बंदोबस्त करण्यात येत नसल्याने अखेर शेवटचा पर्याय म्हणून देसाईगंज येथील पशु मित्र प्रकाश जिवानी व त्यांचे सहकारी पशुमित्र हे येत्या पाच-सहा दिवसांत मोकाट असलेल्या जनावरांना गोळा कडून त्यांना नगर परिषद कार्यालयात आणून सोडणार असल्याची माहिती पशुमित्र प्रकाश जिवानी यांनी दिली.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्टॅन्ड परिसर व ठिकठिकाणच्या वार्डात १५ ते २० जनावरांचा कळप नेहमी फिरत असतो. अनेकदा जनावरे वेगवेगळे गट तयार करून रस्त्याच्या मध्यभागी बसतात. तर बाजार विभागात भाजीपाल्यावरच ताव मारतात. मोकाट जनावरामुळे शाळकरी मुलांतही भितीचे वातावरण निर्माण होते. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली असली तरी स्थानिक पालिका प्रशासन मोकाट जनावरांचे बंदोबस्त करीत नाही. अनेकदा मोकाट जनावरांमुळे अपघाताला समोरे जावे लागते.
विशेष म्हणजे जनावर मालक जनावरे तर पाळतात मात्र त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करू शकत नाही म्हणून त्यांना मोकाट सोडून देतात. अश्यातच मोकाट जनावरांना मिळेल ते खाद्य पदार्थ खातात. अश्यात जनावरांचे आरोग्य सुद्धा खालावते. मात्र पाळणाऱ्यांना खाची काळजी नसते.
याबाबत पशुमित्रांनी अनेकदा पालिकेचे तोंडी व लेखी सुचना दिली परंतु पालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या ५-६ दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास शहरातील मोकाट जनावरे जमा करून त्यांना पालिका कार्यालय परिसरात सोडणार असल्याची माहिती पशुमित्र प्रकाश जिवानी यांनी दिली. यावर मुख्याधिकारी व प्रशासन कोणती भुमिका घेतात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.