प्रतिनिधी बाळू राऊत
घाटकोपर (मुंबई उपनगर ) दि, ०८ जांभळीपाडा विभागातील शिधापत्रिका वाटप केंद्र यू मुंबई ३४ ई १४२ हे रेशन दुकान पूर्वी घाटकोपर प्रभाग क्रमांक १२९ (१३४) नारायण शेठ चाळ विघ्नहर्ता गणपती मंदिराच्या मागे जांभळीपाडा घाटकोपर (पश्चिम ) मुंबई ४०००८४ या ठिकाणी होते. परंतु दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे हे दुकान नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना न देता शेजारील प्रभागातील दिशा हॉस्पिटल जवळ स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागतात तसेच येथून ये जा करण्यास अडचण निर्माण होते. धान्य दुकानांसमोरील रस्ता मुख्य असल्या कारणाने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच महिला वृद्ध अपंग यांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुकानदारास पूर्वीच्या ठिकाणी दुकान चालू करावे असे ग्राहकांनी सांगून ही साफ दुर्लक्ष करीत असल्याने ही बाब नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रभाग क्रमांक १२९(१३४)चे नगरसेवक सूर्यकांत जयहरी गवळी यांनी घाटकोपर येथील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांची भेट घेऊन दुकानदाराने मनमानीपणे दुकान इतरत्र हलवले आहे. त्यामुळे ग्राहकाची गैरसोय झाली आहे. दुकान हे प्रभाग क्रमांक १२९(१३४) मध्येच पुन्हा चालू करावे अशी त्यास तंबी द्यावी व तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.