उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी घेतली संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आढावा बैठक…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पिंपरी : पुढील महिन्यात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज नियोजन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालखी महामार्गाची पाहणी संदर्भात उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी बैठक घेतली.

          यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अप्पर तहसीलदार अर्चना निकम, देहू नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ऍड. कैलास पानसरे, कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, महावितरणाचे सहाय्यक अभियंता विनोद वाघमारे, पाटबंधारे विभागाचे आलेख सहाय्यक पी. जी. सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, देहूरोडचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, सूर्यकांत काळे आदी उपस्थित होते.

         या बैठकीत पालखी सोहळ्याबाबत विविध समस्या समजावून घेत संबंधित विभागाला आपत्कालीन व्यवस्था अंतर्गत त्वरित नियोजन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी दिल्या.

         संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर असलेले ४२ हूंन अधिक गतिरोधक काढण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी असवले यांनी नगरपंचायतला दिल्या. डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचारी संख्या वाढवणे, औषध साठा करणे, रुग्णांसाठी बेड राखीव ठेवणे, आरो फिल्टर प्लांटची व पिण्याचे पाणी तपासणी, व्यवसायिकांना नामांकित (आयएसआय) असणाऱ्या कंपनीचेच मिनरल पाण्याचे बाटल्या विक्री करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. विद्युत पुरवठा संदर्भात जास्त तक्रारी होत असल्याने कर्मचारी संख्या वाढवणे, विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महावितरण अधिकारी यांना देण्यात आल्या. भाविकांना पालखी मार्गावर स्वच्छतागृह व शौचालय उभारणे, शुद्ध पाण्याचे टॅंकर पुरविणे, पहिले आरती स्थळ (दर्गा) आणि दुपारचा विसावा (शनी मंदिर) परिसरामध्ये भाविकांचे पाकीटे, दागिने चोरी होत असल्याने सी.सी. कॅमेरे लावणे आदींची मागणी संस्थानने केली.

     वाहन तळाचे नियोजन करा

          पालखी सोहळ्या दरम्यान भाविकांच्या वाहनांना ओळखपत्र पासेस देण्यात यावेत. त्यांची यादी तयार करावी व इतर वाहनांना पार्किंगसाठी गायरान जमिनीमध्ये नियोजन करण्यासंदर्भात तर स्थानिक नागरिकांनी सोहळ्यादिनी वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. तसेच पालखी मार्गावर आणू नये या संदर्भात देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला.

       इंद्रायणी नदीत मैलामिश्रित पाणी 

 

वडिवळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. मात्र तळेगाव, कामशेत हद्दीतून मैला मिश्रित सांडपाणी तर अनेक कंपनीचे केमिकल युक्त दूषित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने पात्रातील पाणी दूषित होत असल्याची तक्रार पाटबंधारे विभागाने बैठकीत मांडली.