पुणे बाजार समिती सभापतीपदी दिलीप काळभोर तर उपसभापतीपदी रविंद्र कंद बिनविरोध…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : आशिया खंडात दोन नंबर समजल्या जाणाऱ्या बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप काळभोर तर उपसभापती पदी रवींद्र कंद यांची बिनविरोध निवड झाली आहे.

             दिलीप काळभोर, प्रकाश जगताप आणि रोहिदास उंद्रे यांची नावे चर्चेत होते. परंतु दिलीप काळभोर यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल वीस वर्षांनी झाली आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी मोठी होती. पाच वर्षांत सभापतिपद प्रत्येकी एक-एक वर्ष दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलमधील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभापती पद आणि भाजपला उपसभापती पद देण्यात आले आहे. 

            मार्केट वार्डातील मुख्यालयात मंगळवारी (दि.9) सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी पदाधिकारी निवडीसाठी सभेचे कामकाज सुरू केले. त्यामध्ये दिलीप काळभोर यांच्या सभापती पदासाठी संचालक प्रकाश जगताप सूचक असून रोहिदास उंद्रे अनुमोदक आहेत, तर कंद यांच्या उपसभापती पदासाठी प्रशांत काळभोर सूचक असून सुदर्शन चौधरी हे अनुमोदक आहेत.

           दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने पदाधिकारी निवड बिनविरोध झाल्याची माहिती अध्यासी अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या भाजपसह सर्वपक्षीय पॅनेलचे 18 पैकी 13 संचालक निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 2 संचालक आहेत.

         सभापती दिलीप काळभोर हे सहकारातील ज्येष्ठ नेते अशोक काळभोर यांचे भाऊ आहेत. हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सहकारातील तिन्ही महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.