माऊलींच्या समाधीवर चंदनउटीतून साकारला ओझरच्या विघ्नहर गणेश अवतार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी माऊली… माऊली… माऊलींच्या.. नामघोषात संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

          साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्या निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणेश अवतार साकारण्यात आला. आळंदी देवस्थानच्या सहकार्यातून चंदन उटी साकारली. माऊलींचे श्री गणेश अवतारातील हे मनमोहक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

          तत्पूर्वी, माऊलींच्या मंदिरात पहाटे साडेतीन वाजता घंटानाद झाला. साडेपाचच्या सुमारास पवमान पूजा व दुधारती संपन्न झाली. प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. माऊलींना साखरगाठी अर्पण करण्यात आली.

          कारंजा मंडपात परंपरेनुसार गुढी उभारण्यात आली. तद्नंतर ”पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय” असा नामघोष करून भाविकांना ‘श्रीं’च्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. दिवसभरात सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत समाधीचे दर्शन घेतले. दुपारी साखरे महाराज यांच्या वतीने प्रवचन सेवा व वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने किर्तन सेवा संपन्न झाली. अशी माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.