
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या वृद्ध कलावंत मानधन योजनेत मोठ्या प्रमाणावर भेदभाव होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
पात्र असतानाही अनेक ज्येष्ठ कलाकारांचे अर्ज मंजूर न करताच वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जात आहेत.
काही ठिकाणी अर्ज निकाली न काढण्याचे प्रकार दिसून येतात,तर काही ठिकाणी अपात्रतेच्या नाहक कारणांवर अर्ज फेटाळले जातात.
यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकार उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून,शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या मुजोर धोरणामुळे त्यांचा जगण्याचा आधारच हिरावून घेतला जातो आहे.
*****
काय आहे वृद्ध कलावंत मानधन योजना?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील पारंपरिक तसेच इतर कलांमध्ये दीर्घकाळ योगदान दिलेल्या कलाकारांसाठी ही योजना सुरू केली.
यामध्ये ५० वर्षे पूर्ण केलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कलाकारांना मासिक मानधन दिले जाते.
यासाठी अर्जदाराने किमान २० वर्षे कलाक्षेत्रात योगदान दिलेले असणे आवश्यक आहे.
परंतु प्रत्यक्षात ही योजना अनेक वृद्ध कलाकारांसाठी फक्त कागदावरच राहिली आहे.
*****
अर्ज मंजुरीत जिल्हा पातळीवर मोठा भेदभाव..
विविध जिल्ह्यांमधून आलेल्या तक्रारीनुसार,स्थानिक प्रशासनाच्या मनमानी धोरणामुळे अनेक ज्येष्ठ कलाकारांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
काही ठिकाणी मानधन मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता नाही,तर काही ठिकाणी निवड प्रक्रियेत सापडलेल्या त्रुटींमुळे पात्र कलाकारही वंचित राहतात.
तर काही ठिकाणी रुपयांच्या भरमसाठ मागणिनुसार अर्ज पात्र ठरविले जात असल्याचे पुढे आले आहे.
उदाहरणार्थ,पुणे जिल्ह्यातील ७० वर्षीय एकतारी वादक पांडुरंग कदम यांचे म्हणणे आहे, “मी गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागांत एकतारी वादन करून तमाशा आणि भारूडाच्या माध्यमातून लोकसंस्कृती जिवंत ठेवली.
मात्र,माझा अर्ज तीन वेळा फेटाळला गेला.कारण विचारले असता,कधी पुरावे अपुरे,तर कधी आर्थिक निकष पाळले नसल्याचे सांगितले जाते.
आता मी कोणत्या पुराव्यासाठी दारोदार फिरायचे?”असे त्यांचे म्हणणे आहे.
*****
कोणते कलाकार वंचित?
नाटक,डंडार,गोंधळ,भजन लोक प्रबोधन गित,शास्त्रीय संगीत,लोकसंगीत, तमाशा,भारूड,गोंधळ,लावणी यांसारख्या पारंपरिक कला जोपासणारे अनेक कलाकार,चित्रपट व रंगभूमीवर काम करणारे,पण आर्थिकदृष्ट्या मागासलेले कलावंत,आदिवासी आणि ग्रामीण भागात पारंपरिक कला सादर करणारे स्थानिक कलाकार,पारंपरिक हस्तकलेत पारंगत असलेले कलाकार आर्थिक संकटात सापडले आहेत व असे कलाकार अजूनही मानधन योजणे पासून लांब दूर आहेत.
****
मानधन मंजुरीत मुजोरपणा का?
१. अतिरीक्त कागदपत्रांची मागणी…
अनेक वेळा कलाकारांकडे अशा प्रकारची कागदपत्रे मागितली जातात,जी त्यांच्याकडे उपलब्ध नसतात.काही वेळा प्रमाणपत्रांसाठी वशिल्याची गरज भासते.
2. प्रक्रियेत विलंब…
अर्ज सादर केल्यानंतर वर्षेनुवर्षेचा विलंब केला जातो.काही वेळा जिल्हा स्तरावर फाइलच गायब होते.
3. स्थानिक राजकीय हस्तक्षेप…
काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या शिफारशीशिवाय अर्ज मंजूर केले जात नाहीत.त्यामुळे गरीब कलाकारांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागते.
4. प्रस्तावाला मान्यता न मिळणे…
जिल्हास्तरावर योजनेसाठी आलेल्या अर्जांना अंतिम मंजुरीसाठी मुंबईपर्यंत पाठवले जाते,पण तिथेही प्रक्रियेत दिरंगाई होते.
5. अपात्रतेचे कारण पुढे करून अर्ज फेटाळणे…
काही वेळा पात्र कलाकारांनाही “तुम्ही कलाक्षेत्रात २० वर्षे कार्यरत असल्याचा पुरावा द्या” अशी मागणी केली जाते.
अनेक ज्येष्ठ कलाकारांकडे अशा प्रकारची कागदपत्रे नसतात आणि त्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळले जातात.
*****
सरकारचा दुटप्पीपणा?
महाराष्ट्र सरकार दरवर्षी ‘कलावंत गौरव’ सोहळे आयोजित करून कलाकारांचा सत्कार करते,मात्र प्रत्यक्षात कलाकारांना आवश्यक त्या योजना लागू करताना मात्र चालढकल केली जाते.किंवा जात,धर्म,राजकीय पक्ष,पाहून मानधन अर्ज मंजूर केले जातात.
एकीकडे सन्मान सोहळे होतात तर दुसरीकडे तेच कलावंत उपासमारीला सामोरे जातात.सरकार कलाकारांसाठी विविध योजनांची घोषणा करते,पण त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात किती लोकांना मिळतो,याचे कोणतेही स्पष्ट उत्तर सरकारकडे नाही.
*****
कलावंतांच्या व्यथा,“आम्हाला मानधन नको,आमचा हक्क द्या”…
कोल्हापूरच्या प्रसिद्ध लावणीकलाकार मालतीताई जोशी यांचे म्हणणे आहे, “आम्ही आयुष्यभर लोकांसाठी कला सादर केली.
आता वृध्दापकाळात आम्हाला सरकारकडून केवळ काही हजार रुपये मानधन म्हणून हवे नाही,तर हा आमचा हक्क आहे.
पण अधिकारी मात्र आम्हाला भीक मागितल्यासारखी वागणूक देतात.”
*****
काय करता येईल?
१. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया…
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करून,पारदर्शकता आणावी आणि अर्जदारांना अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता यावी.
2. कलाकारांचे स्वतंत्र सत्यापन मंडळ….
कलाकारांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी करणारे स्वतंत्र मंडळ स्थापणे आवश्यक आहे.
3. अर्ज प्रक्रियेत सुधारणा…
पात्र कलाकारांना अपात्र ठरवणाऱ्या अडचणी दूर करून मंजुरी प्रक्रिया वेगवान करणे गरजेचे आहे.
4. राजकीय हस्तक्षेप टाळावा…
जिल्हा स्तरावर शिफारसीच्या नावाखाली होणारी पक्षपाती मानधन मंजुरी प्रक्रिया बंद केली पाहिजे..
*****
ज्येष्ठ कलाकार हे आपल्या संस्कृतीचे जिवंत वारसे आहेत.त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला आणि कलेला जपले आहे.
मात्र,वृध्दापकाळात त्यांची अशी उपेक्षा होणे हे मोठे दुर्दैव आहे.सरकारने आणि प्रशासनाने या कलाकारांच्या व्यथांची गंभीर दखल घेतली पाहिजे.
अन्यथा,भविष्यात लोकसंगीत,नाट्यकला आणि पारंपरिक कलांची परंपरा लोप पावण्याची भीती आहे.