दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
विद्यार्थी हा नवनिर्मितीसाठी उत्साहित असतो.त्याला शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली की तो उंच भरारी घेतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी केले.
नेहरु विद्यालय,चिमूर येथील स्काऊट आणि गाईड विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन विद्यालयात भरवण्यात आले. प्रदर्शनीचे उदघाटन पूनम गेडाम यांचे हस्ते करण्यात आले,याप्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक निशिकांत मेहेरकुरे होते.प्रमुख अतिथी म्हणून सुरेश डांगे,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका किरण उमरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूनम गेडाम यांनी स्वनिर्मितीची अनुभूती प्रेरणादायी असते.त्यातूनच विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना मिळते.अनेक शास्त्रज्ञ शालेय जीवनात शिक्षकांच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे निर्माण झाले. पुढे ते मोठे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.त्यामुळे शाळेत मिळालेल्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी घडत असतात.स्काऊट आणि गाईड विभागाने पुढाकार घेऊन टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्या तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवल्याबद्दल गेडाम यांनी विद्यालयाचे कौतूक केले.
प्रमुख अतिथी सुरेश डांगे यांनी अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना आणि कलात्मकतेला चालना मिळते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांत सृजनशक्तीचा विकास होतो.याच प्रयोगातून एखादा शास्त्रज्ञ उदयास येईल असा आशावाद सुरेश डांगे यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनीत सोलर सिस्टम, प्राचीन जीवन,धबधबा, स्वच्छ भारत, ग्रामीण जीवन,धरण,गुरुकुल मॉडेल, प्राचीन काळातील हत्यारे,संगीत वाद्ये, वायू प्रदूषण,जलचक्र,चांद्रयान आदी विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.
संचालन स्काऊट व गाईड विभागाचे परमानंद बोरकर यांनी केले.प्रास्ताविक पर्यवेक्षिका किरण उमरे यांनी तर आभार सुजाता धोपटे यांनी मानले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचे अवलोकन केले.