कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना व्यक्त होण्यासाठी एक संधी तर प्राप्त होतेच पण त्याचबरोबर सामाजिक जाणीव निर्माण होऊन सेवावृत्ती निर्माण होते. यातूनच व्यक्तिमत्त्व विकसित होत असते.म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाचे एक व्यासपीठ आहे असे प्रतिपादन पंचायत समिती पारशिवनी येथील सभापती मंगला ताई निंबोने यांनी केले.
समाजकार्य महाविद्यालय कामठी द्वारा ‘ युवकांचा ध्यास – ग्राम, शहर विकास ‘ या संकल्पनेवर आधारित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा ‘येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. रुबिना अंसारी होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती करुणा भोवते, ज्येष्ठ पत्रकार गोपाल कडू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरिधर धोटे, उपाध्यक्षा अश्विनी गजभिये, मुख्याध्यापक खुशाल कापसे, पोलीस पाटील संदीप मेश्राम, माजी सरपंच चुडामन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सात दिवस चालणाऱ्या ह्या शिबिरात ग्राम स्वच्छता अभियान, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे बौद्धिक , आरोग्य जनजागृती, समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, गाव सर्वेक्षण, घन कचरा व्यवस्थापन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
उद्घाटनीय समारंभाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ राष्ट्रपाल मेश्राम, सूत्रसंचालन शेखर घाटोळे आणि वैष्णवी बोंदरे, आभार प्रदर्शन लखन लाखे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबीर समन्वयक प्रा.डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, सह समन्वयक प्रा.डॉ.प्रणाली पाटील, प्रा.शशिकांत डांगे, प्रा.गिरीश आत्राम इत्यादी परिश्रम घेत आहेत.