दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत आज दि.9 फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यानिमित्ताने आळंदी ग्रामिण रुग्णालय येथे ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, रुग्ण कल्याण समिती सदस्य व माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले पा., माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीष चोरडिया, पांडुरंग गावडे तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर,स्टाफ व आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात ९ फेब्रुवारीपासून पुढील ६० दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील व पंचक्रोशीतील सर्व शाळा, अंगणवाड्यां मधील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलामुलींची तपासणी,आरोग्य विभागाच्या ग्रामीण व नगरपालिका स्तरावर करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेतून कोणताही लाभार्थी सुटू नये,आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया व उपचार आरोग्य संस्थांमार्फत निःशुल्क प्राप्त व्हावेत, असे निर्देश आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिले आहेत.
या अभियानांतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,आश्रम शाळा,अंध व दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, अनाथालय, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.असे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
सदर महाआरोग्य तपासणी शिबिरांतर्गत येणाऱ्या रुग्णांचा उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी (डायबेटिक रेटिनोपथी),सर्व प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित तपासणी, बाल आरोग्य इत्यादी संदर्भात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सर्व गरजू रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी केले आहे