आळंदीतील अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद करण्याची आळंदीकर ग्रामस्थांची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी हजोरो विद्यार्थी आळंदीत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे, पण गेली काही वर्षापासून वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार होताना दिसत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाची व तिर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत आहे.

            त्यामुळे समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते.

          आळंदीत राज्यातून मोठ्या प्रमाणात मुले-मुली शालेय शिक्षण समवेत वारकरी संप्रदाय शिक्षण घेण्यासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणात वारकरी शिक्षण संस्था असून अनेक संस्था फक्त धर्मदाय कार्यालयात नोंदणी केलेल्या असतात. मात्र अनेक संस्था अनाधिकृत असून त्यांच्या प्रशासकीय अंकुश नसल्याने अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत.

          तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक गैरप्रकार होत असुन वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत अशा अनाधिकृत खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.