दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : अलंकापुरी हे शिवपीठ | पुर्वी येथे होते नीलकंठ | ब्रम्हादिकी तप वरिष्ठ | तपर येथेचि पै केले ||
इंद्र येवानि भुमिसी | याग संपादिले अहर्निशी | इंद्रायणी इंदोरीसी | पंचक्रोशी या पासोनी ||
येथे त्रिवेणी गुप्त असे | भैरवापासुनि भागीरथी वसे | पुर्ववटी जे माया दिसे | ते प्रत्यक्ष जाणा पार्वती ||
भोवती बनवल्ली वृक्षी | देव होवोनि येती पक्षी | हे असो नित्य साक्षी | अस्थी नासती उदकात ||
पंढरीहुनि हे सोपे | जनांची हरावया पापे | कळीकाळ कोपलिया कोपे | न चलेच अलंकापुरासी ||
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलंकापुरी नगरीत पुरातन पद्मावती मातेच्या मंदिरातील प्रांगणात पुरातन काळात पुर्व बाजूला वडाचे झाड असल्याचा उल्लेख काही ग्रंथामध्ये आढळून आले आहे असे आळंदी येथील इतिहास अभ्यासक ॲड.नाझीम शेख यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने शेख यांनी तेथील पद्मावती मातेचे सेवेकरी रानवडे कुटूंबातील व्यक्तीकडे चौकशी केली असता तेथे पुर्वी वडाचे झाड होते असे त्यांनी सांगितले, त्यानुसार तिथे वडाचे झाड असावे असा संकल्प हाती घेऊन दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून ॲड.नाझीम शेख यांनी तेथील बागेत वडाचे झाडाचे वृक्षारोपण विधीवत पूजन करून केले.यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि सुनील रानवडे यांचे सहकार्य लाभले आहे.
पद्मावती मातेच्या परीसरातील बागेत वडाच्या झाडाच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ज्योतिषाचार्य डॉ.श्रीकांत धुमाळ, माजी नगरसेवक डि.डि.भोसले, अविरत फौंडेशनचे अध्यक्ष निसार सय्यद, डॉ.विनायक पावसकर, वृक्षमित्र प्रा.किशोर सस्ते, काळुराम शिवले आदि मान्यवर उपस्थित होते.