दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : समस्त आळंदीकर आणि माऊली भक्तांनची दिवाळी पहाट सुमधुर गायकीने व्हावी, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यमातून गुरुवार (दि.९) वसुबारस ते बुधवार (दि.१५) भाऊबीज पर्यंत दिवाळी पहाट संगीत महोत्सव २०२३ चे आयोजन माऊली मंदीरातील कारंजा मंडपात केले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
दिवाळी पहाट संगीत महोत्सव २०२३ ची सुरुवात गुरुवार (दि.९) वसुबारस दिनी रोजी मुंबईतील अंकीता जोशी, शुक्रवार ( दि.१०) रोजी धनत्रयोदशी दिनी पुण्यातील श्रीमती.यशस्वी सरपोतदार, शनिवार (दि.११) रोजी पुण्यातील अतुल खांडेकर, रविवार (दि.१२) नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन दिनी मुंबईतील भाग्येश मराठे, सोमवार (दि.१३) रोजी अपर्णा केळकर, मंगळवार (दि.१४) दिवाळी पाडवा दिनी सुखद मुंडे आणि बुधवार (दि.१५) रोजी भाऊबीज दिनी मुंबईतील कृष्णा बोंगाणे आणि हभप डॉ.अंबरीष महाराज देगलूरकर यांच्या गायन सेवा संपन्न होणार आहे.
दिवाळी पहाट संगीत महोत्सवात आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख स्वत: उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या दिवाळी पहाट महोत्सवात ज्येष्ठ व नवोदित गायकांमुळे सप्तसुरांचा आविष्कार पाहायला मिळेल. यांच्या अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून आळंदीकरांची दिवाळी पहाट चैतन्याची ठरेल.