ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांची धाडशी कामगिरी… — रेंगेपार कोहळी मधील शेतात पाण्याच्या पाटातील जाळीत अडकलेल्या तीन अजगरांना जीवदान…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

         येथून सात किमी अंतरावर असलेल्या रेंगेपार कोहळी गावातील तेजराम घनमारे यांच्या शेतातील पाण्याच्या पाटामध्ये लावलेल्या जाळीमध्ये मोठे साप अडकून आहेत अशी माहिती त्यांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पिंपळगाव येथील वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर व सर्पमित्रांना दिली.माहिती मिळताक्षणीच पिंपळगावचे सर्पमित्र व वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर खेमराज हुमे,निलेश राहाटे,विरू पवनकर व पवन तिवाडे हे लगेच रेंगेपार कोहळी येथील तेजराम घनमारे यांचे शेतात पोहोचले आणि त्याठिकाणी त्यांना पाण्याच्या पाटाच्या जाळी मध्ये तीन अजगर (Indian Rock Paython) 6 ते 7 फीट लांबीचे अजगर अडकलेले आढळले.

         सर्पमित्रांनी जाळीत अडकलेल्या सापांना जाळी कापून तिन्ही अजगर सापांना अर्ध्या तासाच्या महत्प्रयासाने सुखरूप बाहेर काढले व त्याची माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे सर्पमित्र व वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर मयूर गायधने यांना दिली. मयूर गायधने यांनी लाखनीचे पशुवैद्यकीय अधिकारी कु. देशमुख मॅडम यांना दिली व लगेच पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तिन्ही सापाला नेऊन व उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले .सर्पमित्र व वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर मयूर गायधने आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कू. देशमुख मॅडम यांनी साप दोन ते तीन दिवसा पासून जाळीमध्ये अडकलेले असावे असा अंदाज व्यक्त केला .

          ग्रीनफ्रेंड्सच्या वाईल्ड लाईफ रेस्क्युअरनी केलेल्या या धाडशी कामगिरीबद्दल ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी माहिती देताना सांगितले की अजगर (इंडियन रॉक पायथॉन ) वन्यजीव कायदा 1972 च्या वन्यजीव संरक्षित प्राणीसूची मध्ये येत असल्याने त्यांना जीवदान देणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादित केले.त्यामुळे वरील वाईल्ड लाइफ रेस्क्यूअरनी अर्ध्या तासाच्या महत्प्रयासाने तीन अजगराना दिलेले जीवदान हे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महान कार्य ठरले आहे . ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे,मयुर गायधने, सलाम बेग,विवेक बावनकुळे,धनंजय कापगते, यशपाल कापगते,मनीष बावनकुळे,नितीन निर्वाण,निलेश भैसारे,गगन पाल इत्यादींनी तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी वरील सर्पमित्रांच्या त्वरित हालचाल करून तीन अजगराना जीवदान दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे.