खडकवासल्यातून इंदापूरला अर्धा टि.एम.सी पाणी मिळणार…   — आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीची पालकमंत्री अजित पवारांनी घेतली दखल…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे-कळस-रूई-कौठळी-बिजवडी-तरंगवाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत खडकवासल्यातून पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती.

          या दुष्काळी परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनीही उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना तात्काळ पत्रव्यवहार करून इंदापूरला खडकावासल्यातून पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी केली होती.

           तसेच या भागातील जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,भाजपचे रमेश खारतोडे,बाळासाहेब भांडवलकर,कृती समितीचे अध्यक्ष विजय गावडे,विनोद पोंदकुले,तुषार गावडे,राहुल खारतोडे,स्वप्नील पाटील,विशाल खोमणे,नवनाथ सांगळे आदी शेतकऱ्यांनी एकत्र येत खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून कालच डाळज नं.२ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून दुष्काळाची परस्थिती पाहता लवकरात-लवकर खडकवासल्यातून अर्धा टि.एम.सी. पाणी मिळावे म्हणून पालकमंत्री अजित पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन या शिष्टमंडळाने विनंती केली होती.

           त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून आमदार दत्तात्रय भरणे व खडकवासला कालवा पाणी संघर्ष समितीच्या मागणीची दखल घेऊन खडकवासल्यातून इंदापूर तालुक्यासाठी तात्काळ अर्धा टि.एम.सी.पाणी सोडण्यासंबंधीचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

            त्यामुळे या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून काही अंशी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे.