दशकभरानंतर दिल्लीने ‘मफलरमॅन’ला नाकारले :- हेमंत पाटील… — मोदींच्या नेतृत्वात २६ वर्षांनी राजधानीत ‘भाजप सरकार’…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

               वृत्त संपादिका 

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२५

              देशाच्या राजकारणात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करीत आम आदमी पक्ष राजकारणाच्या रिंगणात उतरला.मात्र, पक्ष स्थापनेपासूनच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ‘आप’चे सत्तेवरील अधिपत्य दशकभरानंतर संपुष्टात आले आहे, अशा शब्दात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.

            सत्तेत असतांना अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवून नागरिकांना थेट लाभ पोहचवला, हे सत्य नाकारता येत नाही. पंरतु, गेल्या काळात पक्ष नेतृत्वासह राज्य सरकारवरून नागरिकांचा विश्वास उडाला होता, हे निकालावरून अधोरेखित होत असल्याचे पाटील म्हणाले. शिक्षण तसेच ‘मोहल्ला क्लिनिक’ मॉडेल मुळे राज्य सरकार चर्चेत होते. मात्र, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींच्या गॅरंटीची जादू अजूनही जनतेच्या मनात कायम असल्याचे यावून दिसून येत असल्याचा दावा पाटील यांनी केला. 

           केजरीवाल यांच्या कार्यकाळात अंमलात आणण्यात आलेली आबकारी धोरण, या धोरणात झालेला भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांसाठी उभारण्यात आलेला ‘शीशमहल’, केजरीवालांसह त्यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना घडलेला कारावास आणि केजरीवाल यांनी राजीनामा देत आतीशी यांना मुख्यमंत्री बनण्याच्या निर्णयामुळे जनतेच्या मनात नेतृत्वासंबंधी संभ्रम निर्माण झाला.भ्रष्टाचाराविरोधात लढतालढता सत्तेवर आलेल्या केजरीवालांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे हाथ भ्रष्टाचाराच्या चिखलात माखण्यापासून रोखता आलेले नाही, अशा शब्दात पाटील यांनी ‘आप’च्या पराजयाचे विश्लेषण केले.

             विशेष म्हणजे मतदारानाच्या चार दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पातून मोदी सरकारने १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त जाहीर केल्यामुळे याचा थेट परिणाम दिल्लीतील मध्यमवर्गीयांवर होत त्यांचे मतदान भाजपच्या पारड्यात गेले. तर, अल्प उत्पन्न गटाने आपच्या बाजूने मतदान केल्याचे समोर आले आहे.आम आदमी पक्षाला राजकीय आखाड्यात टिकून राहायचे असेल तर पक्षांतर्गत चिंतन करण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.