दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी: “मी भाग्यवान आहे की मला आळंदी तीर्थाच्या या पवित्र भूमीवर भगवतांच्या दैवी अस्तित्वाचा अनुभव घेता आला. परमपूज्य गुरुंची उपस्थिती, पवित्र यज्ञ, गौ मातेचे दर्शन आणि मंदिराच्या अध्यात्मिक वातावरणाने माझा दिवस विलक्षण झाला आहे. मी सर्व गुरुंना मनापासून वंदन करतो आणि पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरजी महाराज यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी ह्या महोत्सवाच्यानिमित्ताने आम्हाला दैवी तत्वाच्या जवळ नेले आहे. असे प्रतिपादन बागेश्वर धामचे श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
गीता भक्ती अमृत महोत्सवाचा पाचवा दिवसाला श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु मां, आणि इतर प्रमुख संत आणि व्यक्तिमत्वांचे महोत्सवाला मार्गदर्शन लाभले. सकाळी विठ्ठल नामाच्या गजरात श्रीमद्भागवत कथेला सुरुवात झाली. “विठ्ठल माझा माझा” या सुरांत सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. आज ज्ञानेश्वरोपासनेत परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करत शिष्यांना माऊलींच्या पवित्र शिकवणींचे सखोल ज्ञान दिले. आळंदीतील ८१ हवनकुंडांचा अभूतपूर्व महायज्ञ हे सध्या सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु मां, धर्मरत्न स्वामी श्री गोपालशरण देवाचार्यजी महाराज, पूज्य श्री जीेंतेंद्रनाथजी महाराज आणि भदंत पूज्य डॉ. राहुल बोधीजी यांसारख्या दिग्गजांसह अध्यात्मिक मार्गदर्शक आणि विचारवंतांच्या सन्माननीय उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आली.
परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज म्हणाले, “गीताभक्ती अमृत महोत्सव हा एक अध्यात्मिक जागृती आणि आत्मज्ञानाचा प्रवास आहे. आळंदीच्या भूमीत, श्रीमद् भगवद्गीतेच्या दैवी शिकवणुकीचे साक्षीदार होणे आणि खऱ्या भक्तीचे सार अनुभवणे हा आपला सन्मान आहे.” बागेश्वर बाबांच्या उपस्थितीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे बौद्धिक ज्ञान भाविकांसाठी मार्गदर्शक प्रकाश आहे आणि वैश्विक स्तरावर तरुणांमध्येही या अध्यात्मिक ज्ञानाचे ठसे उमटताना दिसत आहेत.”