
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : भाजपाच्या सध्या सुरू असलेल्या संघटन पर्वाच्या अंतर्गत येत्या 10 जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी ‘घर चलो’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायतीपासून संसदेपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात पक्षाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षाच्या संघटन पर्वाच्या अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात प्रारंभ झाला आहे. 5 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर जाऊन या अभियानात सहभाग घेतला. आता 10 जानेवारी रोजी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रत्येक बुथवर किमान 40 ते 50 घरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रीय सदस्य नोंदणी अभियान सुरू होईल. एका बुथवर पाच सक्रीय सदस्य नोंदवून राज्यात पाच लाख सक्रीय सदस्य नोंदविले जातील, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बावनकुळे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संघटन पर्व प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, बाबा मिसाळ आदी उपस्थित होते.