सोनापुर येथिल मंगेश भांडेकर आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह बेपत्ता… — सावली पोलिसांचे शोधकार्य सुरु…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

          सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथील रहिवासी मंगेश भांडेकर हा स्वतःच्या मुली नामे शिवण्या वय ८ वर्ष व यशिका वय ५ वर्ष या चिमुकल्या मुलींना घेऊन ३१ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार चिमुकल्या मुलींचे आजोबा बंडू भांडेकर यांनी सावली पोलिसात दिली. या तक्रारीवरून सावली पोलिसांनी शोधकार्य सुरु केले आहे.

         मंगेश भांडेकर या व्यक्तीला दारूचे व्यसन असून पत्नी, आई, वडील यांना नशेत अनेकदा मारहाण करीत होता अशी गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून पत्नी आशा मंगेश भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुलींसह माहेरी राहत होती. मात्र मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आणि लहान मुलगी आईकडे दोटकुली येथे राहात होती.

         ती रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता मंगेश भांडेकर ह्याने तेथुन लहान मुलीला घेऊन आला व ३१ डिसेंबर रोजी दोन्ही मुलींना घेऊन बेपत्ता झाला आहे. तो दारूच्या नशेत नेहमी राहत असल्याने व कुठे आहे याची माहिती नातेवाईकांना दिला नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले . मुलींची आई नसल्याने आजी आजोबा यांनी २ जानेवारी रोजी गुरुवारी पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार दिली. तर आई आशा मंगेश भांडेकर हिने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालयात तक्रार दिली आहे.

          गावातील काही महिला ४ जानेवारी रोजी शनिवारी रामटेक येथे देव दर्शनाला गेले असता तिथे मुलींसह मंगेश आढळला होता असे गावात सांगितले. ही माहिती पोलिसांना होताच सावली पोलीस ५ जानेवारी रविवारी कुटुंबियांना घेऊन रामटेक गाठले मात्र तिथे पता लागला नाही.बाल संरक्षण विभागाची टीमही त्यांच्या शोधकार्यात लागली आहे.

          परंतु अजूनही मुलींचा पत्ता लागला नसल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत चे उपसरपंच मुकेश भुरसे यांनी आज दि. ७ जानेवारी रोजी बेपत्ता असलेले मंगेश भांडेकर याचे वडील बंडू भांडेकर व पत्नी आशा मंगेश भांडेकर यांना पोलीस स्टेशन सावली येथे घेऊन गेले व या प्रकरणी चर्चा केली. यावेळी ठाणेदार पुल्लूरवार यांनी पोलीस यंत्रणेमार्फत शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले.