भाविकदास करमणकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
चातगाव वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट्याचा वावर आहे मागील वर्षी या परिसरात वाघाने धुमाकूळ माजवत अनेक मनुष्यबळी घेतला त्यातून सुटका होत नाही, तोवर आता पुन्हा चातगाव वनपरिक्षेत्रातील कुरखेडा येथील महिलेला वाघाने ठार केले. ही घटना सहा डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सदर महिला ही गर्भवती असल्याचे कळते या घटनेने पुन्हा एकदा परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीत आहे. शारदा महेश मानकर वय पंचवीस वर्षे राहणार कुरखेडा चातगाव असे मृतक महिलेचे नाव आहे.
शारदा मानकर ही चातगाव बीटातील जंगलाला लागून असलेल्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेली होती. दरम्यान परिसरात वाघाचा वावर असून शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने शारदा वर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले.
घटनेची माहिती वन विभागाला कळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.मृतांचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतक महिलेस एक चिमुकला असून तिच्या अशा मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान सदर घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. मृतास महिलेच्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा असे मागणी सुद्धा केली आहे.
चातगाव परिसरात वाघाचा व बिबट्याचा वावर आहे अशी माहिती चातगाव वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक परशुराम मोहरले यांनी कळविले होते. अशा आशयाची बातमी दोन डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. चार दिवसानंतर वाघाने चातगाव वनपरिक्षेत्रात कुरखेडा येथील महिलेवर हल्ला करून महिलेला ठार केले.जंगलामध्ये जात असताना नागरिकांनी उचित काळजी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांनी केले आहे.