महाराजस्व अभियानातून महसूलची प्रतिमा उजळणार :- आ.धर्मराव बाबा आत्राम… — काटेपल्ली येथे महाराजस्व अभियान संपन्न…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी:- महसूल विभागाच्या कारकूनी कामात अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः नाकीनऊ येत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.मात्र, दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी शासनामार्फत राज्यात महाराजस्व अभियान सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना लोक कल्याणकारी योजनांची माहिती तसेच एकाच मंचावर विविध दाखले,प्रमाणपत्र सहज उपलब्ध होत आहे.या महाराजस्व अभियानामुळे महसूल विभागाची प्रतिमा नक्कीच उजळणार असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

          अहेरी महसूल प्रशासनातर्फे काटेपल्ली येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून प्रभारी तहसीलदार दिनकर खोत, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, देवलमरीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, इंदारमचे सरपंच हर्षा पेंदाम, नायब तहसीलदार नाना दाते, नायब तहसीलदार कल्पना सुरपाम, उपजिल्हाधिकारी कार्यालय येथील नायब तहसीलदार मनोरमा जांगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, राकाचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,ग्रा प सदस्य किशोर करमे,ग्रा प सदस्य सालय्या कंबालवार आदी मान्यवर उपस्थित होते.

          पुढे बोलताना महाराजस्व अभियानातून शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकरी योजना राबविल्या जात आहेत.या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी येत आहे. त्यामुळे या योजनांची पुरेपूर माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असेही त्यांनी आवाहन केले.

         प्र.तहसीलदार दिनकर खोत यांनी प्रास्ताविकेतून महाराजस्व अभियानात वाटप करण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र तसेच लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिली.तर,प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात शिबिरात महसूल व विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच दाखले आणि प्रमाणपत्र त्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे याची विविध विभागाने काळजी घ्यावी तेंव्हाच ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी होणार असल्याचे मत मांडले.

             शिबिरात विविध विभागाकडून स्टॉल लावून विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.महसूल विभागाकडून जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र,उत्पन्न दाखले,शिधा पत्रिका,जॉब कार्ड,आभा कार्ड आदी वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी,तलाठी आदी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.