ऋषी सहारे
संपादक
सकाळी ७ वा. च्या सुमारास अहेरी आगारातून एटापल्ली मार्गे गडचिरोलीकडे निघालेल्या बस ला ट्रक ने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी एसटी महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सुरजागड लोह प्रकल्पाविषयी लोकांमध्ये रोष निर्माण झाल्या असून लवकरात लवकर वाहतूक न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी दिला आहे.
अहेरी-एटापल्ली-जारावंडी मार्गे गडचिरोली कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या (एम एच-४० ए क्यू – ६०९४) या बस ला आलापल्ली च्या एटापल्ली रस्त्यावर सुरजागड चा लोहखनिज घेऊन आष्टीकडे जाणाऱ्या (ओ डी-०९ जी-०८५५) या ट्रकने धडक दिली.बस ला धडक देताच बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडले.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.माहिती मिळताच अहेरीचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोण्डसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.सध्या एटापल्ली-आलापल्ली-आष्टी या मुख्य मार्गावर अपघात,वाहतूक कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे.त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने या अगोदरच प्रशासनाला निवेदन दिले आहे.योग्य नियोजन आणि नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अश्या घटना घडत असल्याची ओरड सुरू आहे.प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.