वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील कळमना (बु) येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत वर्ग पहिली ते सातवी आहे. तर विद्यार्थ्यांची पटसंख्या ९२ असून शाळेत एकच शिक्षक: गेल्या चार वर्षापासून शिक्षण देत आहे. एक शिक्षक पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कसा काय शिक्षण देऊ शकेल? असा सवाल करून गावकऱ्यांनी वारंवार शिक्षकांची मागणी केली परंतु आजपर्यंत एकही शिक्षक देण्यात आले नाही. हि बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पटसंख्या नुसार शिक्षक देण्याची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे बुधवारी दि.६ जुलै ला एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना काळात दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने पालकांनी तसे काही याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना शिकविणार तरी कोण? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांवर पडला आहे. या प्रकाराची माहिती मनसेला मिळताच त्यांनी एका निवेदनाद्वारे विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून शाळेत पटसंख्यानुसार व वर्गानुसार शिक्षक नेमण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिक्षण विभागाच्या कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन करेल, यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कळमना बु येथिल मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
मनसेचे निवेदन आणि शिक्षकाची नियुक्ती
तालुक्यातील कळमना बु येथे वर्ग एक ते सात असून विद्यार्थी पटसंख्या ९२ आहे. पटसंख्या नुसार एक शिक्षक असुन आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनाथ देवतळे शिक्षणाधिकारी वणी