भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांचा भाजपला रामराम…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून मोठा विरोध पाहायला असून भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

         शिरुर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटीलांच्या यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपात नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख भाजपातुन बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे.

       भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुख यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजपाने विकासाबाबत विश्वासात घेतले नाही. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत अतुल देशमुख यांनी पक्ष ताकद देत नसल्याने बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पदाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

          भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अतुल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. त्यामुळे ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता भाजपातून बाहेर पडल्यानंतर अतुल देशमुख काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.