डॉ.हुलगेश चलवादींच्या नेतृत्वात ‘बसपा’ आगामी निवडणुका लढवणार… — पुणे जिल्हा अध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची निवड…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

दिनांक ७ मार्च २०२५, पुणे

            बहुजनांचे वैचारिक विचारपीठ असलेल्या बहुजन समाज पक्ष ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वात लढणार आहे.या अनुषंगाने पुणे जिल्ह्याची जुनी कार्यकारिणी बरखास्त करीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

           आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशोकराव गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याच्यासह ३१ जिल्हा प्रभारी तसेच १० जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (दि.७) दिली.

                 बसपचे प्रदेशाध्यक्ष ॲड.सुनिल डोंगर यांच्या आदेशान्वे पुणे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. नवीन कार्यकारिणी निवडीची जबाबदारी डॉ.चलवादी यांच्यावर सोपवण्यात आली होती. डॉ.चलवादी यांनी महापुरूषांना अभिवादन करीत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद,पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुका डॉ.चलवादी यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

           पक्षाने सोपवलेल्या नेतृत्वामुळे जबाबदारी वाढली असून आणखी वेगाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याची भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बसपा पुर्ण ताकदीनिशी लढवणार आहे.

           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बहुजनवादी शासनकर्ती जमात होण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यात येतील. तळागाळातील शोषित ,पीडित, वंचित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बसपाचा ‘निळा झेंडा’ आणि ‘हत्ती’ निवडणूक चिन्ह सर्वत्र पोहचवून संघटन बांधणी आणखी बळकट करू, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.