अभिरूप युवा संसदेत जिल्ह्यातील दोन युवकांनी केले प्रतिनिधित्व…

    चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

          युवक बिरादरी भारत आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभिरूप युवा संसद स्पर्धेचे आयोजन एमआयटी पुणे येथे करण्यात आले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील भीष्म बाळाजी लांडगे आणि लिखित प्रकाश पुडके या दोन युवकांना पुण्याच्या कॅलिडस मीडिया अकॅडमीच्या संघाद्वारे बोलण्याची संधी मिळाली.

         युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अभिनव उपक्रम आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, मानद सदस्य रवी चौधरी, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रमुख डॉ. श्रीधर पेरीसेट्टी उपस्थित होते. तसेच परिक्षक म्हणून राजकीय विश्लेषक , लेखक श्रीरंजन आवटे, उद्धव धुमाळे यांनी काम पाहिले. युवक बिरादरीचे संचालक पंकज इंगोले, समन्वयक सचिन वाकुळकर, गायत्री जलेला, पुणे युवक बिरादरीच्या सदस्या श्वेता मोहिते, सोनम पांडे हेदेखील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

           यावेळी विजेत्या संघाला प्रथम पुरस्कार आणि अन्य सर्व संघांना प्रमाणपत्र देण्यात आले. तरुणांना संसदीय शासन पद्धती कळावी, त्यांची राजकीय प्रगल्भता वाढावी यासाठी युवक बिरादरी भारत संस्थेच्या वतीने अभिरुप युवा संसदेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाते.

         या अभिरूप युवा संसदेत युवकांना लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार, संसदीय सचिव अशा सर्व भूमिका निभावता आल्या. युवकांनी निभवल्या.

           यामध्ये भंडारा जिल्ह्यातील भीष्म लांडगे यांनी विरोधी पक्षनेता ही भूमिका बजावली, तर लिखित पुडके हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने रस्ते वाहतूक मंत्री ही भूमिका निभावली. त्यांच्या या लक्षवेधी उपलब्धीबद्दल जिल्ह्यात सर्वत्र दोघांचे कौतुक होत आहे. यापूर्वी देखील या दोघांनी अभिरूप युवा संसदेत सहभाग नोंदवला आहे.

प्रतिक्रिया

 – या सुंदर उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक दिवस लोकप्रतिनिधी सारखं बोलू शकलो, संसदीय शासन पद्धती काय असते हे प्रत्यक्षात अनुभवू शकलो, ही आमच्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे, आमच्यासारख्या युवकांना संधी उपलब्ध करून देते, यासाठी आम्ही युवक बिरादरी भारत संस्थेचे तसेच युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.

– भीष्म लांडगे, लिखित पुडके.