जन्म : ७ फेब्रुवारी,१८९८
निधन : २७ मे,१९३५
विश्वरत्न,बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात,थोर कार्यात सुशील व कर्तव्यदक्ष शालीनतेची आणि विनम्रतेची करुणेची मूर्ती माता रमाई,या धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा आणि त्याग महान ठरला आहे.
रमाईच्या समर्पित जीवनामुळेच डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाला,त्यांच्या कार्याला प्रेरणा,गती मिळाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.रमाईने आपल्या आयुष्याचा क्षण नि क्षण आणि शरीराचा कण नि कण सदैव डॉ.बाबासाहेबांच्या सत्कार्याला वाहिला,खर्ची घातला.
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संसाराचा भार रमाईवर सोपवून समाजकार्यासाठी वादळासारखे बहुजन हिताचे कार्य करीत होते.रमाईने कधीही आपल्या पतीला त्यांच्या कार्यात अडविले नाही.कधी भांडली नाही, रुसली नाही,उपाशीतपाशी जीवन जगली.
तिला वेळेवर वस्त्र,साडी-चोळी,दागदागिने मिळाले नाही,परंतु या मातेने कधीही तक्रार केली नाही इतकी सहनशीलता अशा सर्वगुणसंपन्न,सद्गुणी करणामयी माता रमाईचे जीवन चरित्र इतिहासात ज्या थोर स्त्रिया होऊन गेल्या आहेत त्यामध्ये उठून दिसते.
तिच्या त्यागामुळे व साक्षीने तसेच आधाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशातील कोट्यवधी दलित-शोषितपीडितांना स्वाभिमानाची शिकवण देऊ शकले.रमाईने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा,भावना,ऐहिक सुखाचे बलिदान करून लाखो दलितांना आईचे प्रेम व ममता दिली आणि कोटी कोटी जनांची ती महामाता ठरली.
एवढेच नव्हे,तर आई जशी आपल्या बाळाची काळजी करते, तशा रमाई डॉ बाबासाहेबांची सेवा करायच्या.अशा त्यागी ममताळू, हळव्या मनाच्या रमाईचे जीवन चरित्र नेहमी वाचावे आणि तिच्या आदर्श गुणांचे अनुकरण करावे असेच आहे. ते जीवन,त्यांचा त्याग आजही आठवला तर ह्रदय पिळवटून येते.
त्यांच्या सहनशीलतेला, महान त्यागाला जगात तोड नाही.त्यांचे जीवन चरित्र वाचताना,ऐकताना मन दाटून येते.
आज जयंती दिनानिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या सम्यक स्मृतींस विनम्र अभिवादन!