प्रागतिक पक्षांची ९ डिसेंबरला गडचिरोलीत महासभा होणार… — सुव्यवस्थेच्या कारणावरुन पोलिसांनी उलगुलान महामोर्चाची परवानगी नाकारली…

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली : प्रागतिक पक्ष,महाराष्ट्र आघाडीच्या वतीने ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या उलगुलान महामोर्चाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरुन पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक आणि प्रागतिक पक्ष आघाडीच्या नेत्यांमध्ये काल झालेल्या चर्चेनंतर बंदिस्त सभागृहात सभेला परवानगी देण्याचे पोलिस विभागाने मान्य केल्याने आता ९ डिसेंबर रोजी शहरातील चंद्रपूर रोडवरील अभिनव लाॅन येथे महासभा होणार आहे.

            गैरआदिवासी, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाला आदिवासी समाजाने कधीच विरोध केलेला नसतांना भाजपने पेसा कायदा विरोधी वातावरण जिल्ह्यात निर्माण करुन वेळोवेळी समाजात तेढ निर्माण केली आणि बेकायदेशीर खाणींचे रोजगाराच्या नावावर समर्थन करुन जिल्ह्याला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचले असून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या खांद्याला खांदा लावून दलित, ओबीसी, भटके विमुक्त आणि जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसभा सहभागी होणार आहेत.

             या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिट ब्युरो सदस्य काॅ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. ॲड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके हे करणार आहेत. आमदार शामसुंदर शिंदे, आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार यांचेसह जनता दल (सेक्युलर) चे नाथाभाऊ शेवाळे, शामदादा गायकवाड, भाकपा ( माले) लिबरेशन पार्टीचे काॅ. श्याम गोहील, श्रमिक मुक्ती दलाचे काॅ. भारत पाटणकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले, भाई प्रा.एस.व्ही.जाधव, भाई ॲड. राजेंद्र कोरडे हे या सभेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या विषयावर महासभेत होणार मार्गदर्शन

            पेसा, वनाधिकार कायद्यांचा उल्लंघन करून बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सुरजागड, झेंडेपारसह मंजूर व प्रस्तावित लोहखाणी तात्काळ रद्द करा. पाचव्या अनुसूची क्षेत्रातील ग्रामसभांचे स्वयंशासनाचे अधिकार डावलणे बंद करण्यात यावे. बेकायदेशीर लोहखाणी खोदण्याकरिता विरोध करणाऱ्या ग्रामसभांच्या नागरिकांना नक्षल समर्थक भावनेने कारवाई करणे बंद करण्यात यावी. मच्छीमार समाजाला नदी, नाले, तलावांची मालकी हक्क देण्यात यावे. जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९% करा. आदिवासींची डी लिस्टिंग करण्यात येऊ नये. धानाला रुपये ३,५००/- हमीभाव देण्यात यावा. प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्यात यावेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने करीता जात प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना किमान वेतन लागू करावे. हत्ती व वाघांच्या हल्ल्यात बळी पडून मृत्यू झालेल्यांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने देण्यात यावी. व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आणि बारमाही वीजपुरवठा करण्यात यावा. गडचिरोली शहरातील सर्व झोपडपट्टी कायम करुन जागेचे प्राॅपर्टी कार्ड आणि घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, याविषयी या सभेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईलियास पठाण, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी, भाकपचे जिल्हा सचिव देवराव चवळे, शेकापचे भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा यांनी दिली आहे.