सोनिया गांधी या दूरदृष्टीच्या नेत्या आहेत :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, हे कायदे आणि मनरेगा योजना आणणाऱ्या आदरणीय सोनिया गांधी या दूरदृष्टीच्या नेत्या आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी ‘सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहा’च्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.

           अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’चे उदघाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

           या प्रसंगी माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, डॉ.कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे तसेच दत्ता बहिरट, लता राजगुरू, अविनाश बागवे, सदानंद शेट्टी, चंद्रशेखर कपोते, भीमराव पाटोळे, अनील सोंडकर, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, सप्ताहाचे व्यासपीठावर उपस्थित होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. 

             सोनियाजींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला, त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. १९९१साली सोनियाजींनी केवळ इच्छा व्यक्त केली असती तरी, त्या पंतप्रधान झाल्या असत्या. २००४सालच्या निवडणुकीतील विजय हा सोनिया गांधींचा होता. त्यांच्या जाहीरनाम्यावर लोकांनी मते दिली. तरीही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

             विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करून लोकांच्या मनातील संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. सोनिया गांधींच्या त्यागाची आठवण जपणारा असा उपक्रम देशात कुठेही होत नाही. मात्र, गेली २० वर्षे आपण हा उपक्रम सातत्याने चालू ठेवला आहे. याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

           सोनिया गांधी यांनी भारतीय संस्कृती जपली. त्यांनी भारताची सेवा केली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम सध्या सुरू आहे, त्या विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

            विधानसभा निवडणुकीतील एकतर्फी निकालामुळे अस्वस्थता असली तरी, काँग्रेसचा कार्यकर्ता ‘जिवंत’ आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तो तयार आहे, अशी ग्वाही मी यावेळी बोलताना उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. दत्ता बहिरट यांनी सर्वांचे आभार मानले.