ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज: दि.६
महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना अधिक लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवले जाणार आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू झालेले अभियान १ आक्टोबर २०२४ पर्यंत राबविले जाणार असून त्यामध्ये तब्बल एक कोटी महिलांना महिला शक्ती कायद्याच्या माध्यमातून नारी सत्तेचे सशक्तिकरण करण्याचे आणि महिला बचत गटाच्या प्रवाहात आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
ते देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतीने मौजा शिवराजपूर येथे दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमात प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे, तहसिलदार प्रिती डूडुलकर, शिवराजपूर ग्रा.पं. चे सरपंच सुषमाताई सय्याम, कोंढाळा ग्रा.पं. चे अपर्णाताई राऊत, गेडाम मॅडम, उपसरपंच रमेशजी वाढई, उपसरपंच सुरेशजी दोनाडकर, सूरेशजी दोनाडकर उपसरपंच, बिडियो भस्मे मॅडम, पाटिल जी, भाजप कार्यकर्ते प्रमोद झिल्पे, दादाजी झिल्पे, प्रमोदजी बेदरे, चीलबुलेजी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, महसुली विभागात किमान वीस लाख महिलांना, प्रत्येक जिल्ह्यात किमान २ लाख ५० हजार, तालुकास्तरावर किमान ३० हजार आणि गावस्तरावर किमान दोनशे महिलांना अभियानाच्या माध्यमातून जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यानंतर शासनाचे विविध विभाग, प्रशिक्षण संस्था, सेवाभावी संस्था इत्यादींच्या माध्यमातून किमान दहा लाख महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातूनही त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना वित्तीय भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून उद्योगवाढीसाठी महिलांना मोठा लाभ होईल, असे सरकारचे नियोजन आहे.
महिला सशक्तिकरण अभियानात मानव विकास विभाग, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, कृषी विभाग, विद्युत विभाग, अन्न व पुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत विभाग, संजय गांधी निराधार आदी विभागांनी स्टॉल लावून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शिधापत्रिका, नवीन मीटरचे वाटप, बचत गटांना धनादेश वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, गोल्डन कार्ड चे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, रोटावेटर वाटप, उज्वला योजनेतून गॅसचे वाटप, दिव्यांग प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, आधार कार्ड चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.