बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालातून जनतेने भाजपला स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणूकीच्या निकालातून इंदापूर तालुक्यातील भाजपचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रा.पं. निवडणूक निकालानंतर सोमवारी (दि.6) दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये बावडा तसेच वकीलवस्ती, शेळगाव, शिंदेवाडी, काझड, लाकडी या 6 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये तालुक्यातील मोठी असलेली बावडा तसेच काझड, लाकडी या 3 ग्रामपंचायतीचे सरपंचपद तसेच ग्रा.पं.सदस्य संख्येतही भाजपने बहुमत मिळविले आहे. शेळगाव, शिंदेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने तर वकीलवस्ती येथे स्थानिक आघाडीने सत्ता मिळवली आहे. बावडा गावच्या सरपंचपदी भाजपच्या पल्लवी रणजित गिरमे ह्या तब्बल 1432 मताधिक्याने निवडून आल्या आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीतील भाजपच्या पॅनलला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून भाजपला विरोधकांपेक्षा अधिकचे मतदान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवरुन जनतेने भाजपला पसंती दिली आहे, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले.
भाजपचे गावोगावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदापूर तालुक्यात आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, निवडणूक म्हंटले की हार-जीत असते, त्यामुळे निवडणुकीचा विषय कार्यकर्ते व उमेदवारांनी आजपासून संपवून सर्वांनी एकत्रितपणे गावच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहन केले. राज्यातील सत्तारूढ महायुतीला सरकारला जनतेने पसंती दिल्याचे सर्व ग्रामपंचायत निकालातून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले. राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आजच्या निकालाप्रमाणे महायुतीच्या विजयाचा कौल कायम राहील, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये विजयी झालेल्या सर्व सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचे अभिनंदन केले.