पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज/ वडसा
कोरची :- आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या बहुतांशी भागातील नागरिक हे अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात वास्तव्यास आहेत. मात्र वीज, पाणी, रस्ते,आरोग्याच्या सुविधा अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.
त्यामुळे दुर्गम भागातील नागरीकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन विकासाच्या प्रवाहात आणणे ध्येय असल्याची माहिती काँग्रेस नेत्या डॉ. शिलू चिमुरकर यांनी कोरची येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला युवा नेते पिंकू बावणे, वैष्णवी आकरे वडसा, गिता नाकाडे विसोरा, देवका शेंडे विसोरा, लिलाधर भर्रे, आसाराम बाळबुद्धे, देवा सहारे कोरेगाव, बागेश्वर आळे, कृष्णा उईके, सदाशिव चिंचेकर, गोपाल शेंदरे, नंदलाल गोंडाणे, मोतीराम कांबळे, महादेव कुंमरे बोळधा, सर्वेश्वर मेश्राम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिलू चिमुरकर यांनी कोरची तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू करून येथील लोकांशी थेट संवाद साधणे सुरु केले आहे. कोरची तालुक्यात विविध गावात ही संवाद यात्रा आठ दिवस चालणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.
तसेच कोरची तालुक्यात रस्ते विकासात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आल्याने अद्यापही दुर्गम भागातील गावे पक्के रस्त्याशी जोडण्यात आले नाहीत. ज्या गावांचा पावसाळ्यात मुख्य मार्गाशी संपर्क तुटतो अशा गावांना बारमाही रस्त्याशी जोडण्याला प्रथम प्राधान्य असेल.
प्रत्येक गावात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात, दुर्गम भागात मलेरीयाच्या प्रकोपाने दरवर्षी अनेकांचा बळी जात आहे ते थांबवण्याला प्राधान्य देऊन दुर्गम भागातील नागरीकांना आपल्या न्याय हक्कासाठी जागृत करणे हे ध्येय असल्याचे सांगीतले.
तथापी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहु नये व शिक्षणापासून वंचित राहु नये याकरीता प्राधान्याने समस्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. आरमोरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल असुन वनसंपदेने नटलेला परिसर आहे.तसेच मौल्यवान खनिज, वनसंपदा आहे. जल, जंगल, जमिनीचे खरे संरक्षण आदिवासीच करू शकत असल्याने त्यांच्या मौलिक अधिकाराचे संरक्षण काँग्रेसच करू शकते.
त्यामुळे काँग्रेसचे विचार घरा घरापर्यंत पोहचवणे हे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेला कोरची तालुक्यातील समस्त पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.