‘लंडन सफरनामा’ पुस्तकाचा ९ सप्टेंबर रोजी  प्रकाशन सोहळा..

 

      दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक पुणे विभाग

पुणे : ॲड.संग्राम शेवाळे लिखित ‘लंडन सफरनामा’ पुस्तकाचा ९ सप्टेंबर रोजी प्रकाशन सोहळा पुण्यात आयोजित केला आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ४ वाजता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. माजी मंत्री महादेव जानकर,ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, बी.जे.कोळसे-पाटील, डॉ.कुमार सप्तर्षी, आमदार जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जनता दल(सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. या पुस्तकाचे लेखक ॲड.संग्राम शेवाळे यांनी बुधवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दत्ता पाकिरे, सचिन पांडुळे यावेळी उपस्थित होते.

            ॲड.संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, पर्यावरण, आर्थिक, आदी विषयाबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन ‘लंडन सफरनामा” या पुस्तकात केले आहे. लंडन व भारताचे गेले अनेक वर्षांचे नाते असून याबाबतचा संपूर्ण इतिहासाचा उल्लेख या पुस्तकात केला आहे, तसेच परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शासनाच्या विविध योजनाची माहिती या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक ठरणार आहे.

           ॲड.संग्राम शेवाळे यांनी (BALLB) चे शिक्षण हे पुणे येथील भारती विद्यापीठ येथे पूर्ण केले असून, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असताना लंडनच्या पार्लमेंट समोर भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र करून 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती उत्साहात साजरी केली होती. त्यांच्या या शिवजयंती सोहळ्यामुळे देशाची मान उंचावली आहे.

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवास्थानी भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन भेट दिली. ॲड.संग्राम शेवाळे यांनी इंग्लंड येथील सार्वजनिक संसदीय बैठक मंचामध्ये सहभाग घेऊन भारतीय विद्यार्थांचे प्रश्न या बैठकीत मांडले. तसेच भारतातून परदेशात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थीसाठी संग्राम शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल, जेवणाची सोय, प्रवास, तसेच लंडन सारख्या देशात भारतीय तरुणाची मोठी फळी उभी करून अनेक भारतीय विद्यार्थासाठी मार्गदर्शन व मदतीचे काम केले. लंडन या ठिकाणी असलेली भारतीय उच्च आयुक्तांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडचणी व प्रश्न मार्गी लावले.

          ॲड.संग्राम शेवाळे यांचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा व स्व माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 

            “लंडन सफरनामा” हे पुस्तक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक, ऐतिहासिक कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात काम करणान्या नागरिकांसाठी व परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास ॲड.संग्राम शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.