ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या बालगोपाळांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभाग

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव निमित्ताने दहीहंडीचा उत्सव संगीत वाद्यांच्या आवाजात तसेच चिमुकल्या बालगोपाळांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. 

         यानिमित्ताने माऊलींच्या बागेची फुलांच्या हारांनी सजावट करण्यात आली. चिमुकल्या बालगोपाळांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत दोन तीन चार थर लावून दहीहंडी फोडण्याचा आनंद आपल्या नृत्यातून व्यक्त केला. बालवाडी ते चौथीपर्यंत गोपिका पथकाने या उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक वर्गाला क्रमाने दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केलेल्या गोविंदा पथकाने आणि गोपिका पथकाने गाण्यावर नृत्याचा फेर धरत आनंद लुटला.

          राधा व कृष्णाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौथीच्या शिवनेरी व रायगड या दोन्ही गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. शेवटी मुलांना गोपाळकाल्याचा प्रसादाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले.