चौथा टप्पा:९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील वंचित बालकांचे लसीकरण… — जिल्हयात गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.06: जिल्हयात गोवर संसर्गजन्य आजाराची साथ नाही, परंतु सद्य:स्थितीत राज्यातील काही भागात गोवरसदृश लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी मोहिमेचा चौथा टप्पा मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. येत्या ४ एप्रिल ते १० एप्रिल या तारखेपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशित केल्यानुसार गोवर – रुबेला विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण राबविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते.त्यानुसार पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबर २०२२, दुसरी फेरी १५ते २५ जानेवारी २०२३ व तिसरी फेरी ४ ते १० मार्च या कालावधीत पार पडली . आरोग्य प्रशासनाकडून अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रातील जसे वीटभट्टीतील, जंगलव्याप्त गावे, रस्ता नसलेली गावे, स्थलांतरित मजूर, वीट्टाभट्टीतील घरांना भेट देऊन पर्यवेक्षण करुन ९ ते ५ वर्षांपर्यंतच्या वंचित बालकांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात आले. मोबाईल पथकाकडून विशेष लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करण्यात आले होते.तसेच नियमित लसीकरण सत्रात सुध्दा आरोग्य सेविकांनी जिल्हातील बालकांना लसीकरण करुन सुरक्षित केले. तसेच गोवरकरीता नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. ० ते ६ महिन्यांपर्यतच्या बालकांना मातेच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे त्यांना धोका नसतो, परंतु ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर – रुबेला लसीकरण करणे गरजेचे आहे. असे डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी कळविले आहे. तसेच वंचित बालकांसाठी ही चौथी विशेष शोध व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. वंचित बालकांना लसीकरण करुन सुरक्षित केले जाणार आहे. असे डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी सांगितले आहे.

काय आहेत लक्षणे-

   ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. शरीरात प्रवेश केल्यानंतर ७ ते १० दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरूवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक, दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. त्यानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.