दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : आळंदी नगरपरीषदेच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गावरील भरली जाणारी भाजी मंडई आळंदी नगरपरीषदेच्या शाळा क्र. ४ च्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
आळंदी नगरपरीषदेच्या मागील भागात भाजी मंडई भरली जात होती त्या मार्गावर आळंदी ग्रामीण रुग्णालय अाहे, ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गावर अनेक शेतकरी तसेच पथारी व्यावसायिक भाजी विक्री करत होते त्यामुळे तिथे भाजी घेण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहन पार्क करत असतात त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला नेहमी अडचण निर्माण होते होती वेळोवेळी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने मागणी करुनही आळंदी नगरपरीषद प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करत असत पण दुसऱ्या दिवशी परत भाजीविक्रीते रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसत होते. रविवार दि. ५ रोजी सायंकाळी पाच दरम्यान एक अपघातग्रस्त तरुणीला रुग्णवाहिका आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी येत असताना रस्त्यावरील भाजी विक्रीसाठी बसणाऱ्यांमुळे व दुचाकी वाहन पार्किंगमुळे उशीर झाला त्यामुळे त्या अपघातग्रस्त तरुणीचे उपचारापूर्वीच निधन झाले.
दुसऱ्या दिवशी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आळंदी नगरपरीषदेचे प्रशासन यांच्यात पोलिस स्टेशन मध्ये बैठक झाली आणि त्यात दोन दिवसात भाजी बाजार नगरपरीषदेच्या शाळा क्र. ४ च्या मैदानावर स्थलांतरित होईल यात एकमत झाले त्यानुसार गुरुवार दिनांक ९ पासुन सदरचा भाजी बाजार मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार आहे.