धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना लुटले, लुटारुंवर फौजदारी गुन्हे दाखल करा… — शेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी… 

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली : ४० किलो ६०० ग्रॅम प्रती गोणी वजनाप्रमाणे धान खरेदी करण्याचे शासनाचे धोरण असतांना ओलाव्याच्या नावाखाली ४२ ते ४३ किलोची खरेदी करून जिल्हाभरातील खरेदी केंद्रांवर ८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची लुट शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांविरोधात शहानिशा करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.

          शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यात येते. सध्या आदिवासी विकास महामंडळाचे ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनचे २१ असे साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर ही धान खरेदी सुरु असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुन लुट करण्यात येत आहे. शासन नियमा प्रमाणे खरेतर एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र जिल्हाभरातील सर्व धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

           सदरच्या प्रकाराबद्दल शेतकरी जेव्हा विचारणा करतात तेव्हा, हे अधिकचे वजन ओलाव्याचे म्हणून घेण्यात येत आहेत असे उत्तर दिले जात आहेत. मात्र एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनातून शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० लाख क्विंटलपेक्षा अधिकची धान खरेदी करण्यात आलेली असून यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ८ कोटीपेक्षा जास्त रुपयांची खरेदी केंद्रांवर अधिकचा धान प्रति पोत्यामागे घेवून लुट करण्यात आलेली आहे. 

            त्यामुळे प्रत्येक खरेदी केंद्रांवर आपली खास पथके पाठवून व पोत्यांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या वजनाची तपासणी केली जावून या महालुटीची शहानिशा करण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येवून अधिकच्या खरेदीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यावी अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.