1 नोव्हेंबर ला धान विषयावर महत्त्वपूर्ण बैठक….. — खा.सुनील मेंढे यांनी केला होता पाठपुरावा…..

 प्रितम जनबंधु 

     संपादक 

भंडारा :- आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या समस्यांना घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी अनेकदा शासन स्तरावर मुद्दे उपस्थित केले. याच अनुषंगाने एक नोव्हेंबर रोजी मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

              धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून विक्री करताना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे अडून राहणारे पैसे आणि धान खरेदी केंद्राच्या बाबतीत पुढे येणाऱ्या गैरव्यवहाराच्या आणि धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या अडचणींच्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री आणि अन्य महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांसोबत सातत्याने पत्रव्यवहार केला. नवीन धान खरेदी सुरू होण्यापूर्वी या सर्व अडचणी दूर व्हाव्यात या मागणीला घेऊन चर्चाही केली गेली. 

                          दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही हा विषय गांभीर्याने घेऊन महत्वपूर्ण बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली जाणार होती. मात्र आता ही बैठक एक नोव्हेंबर रोजी मुंबईला सह्याद्री येथील सभागृहात होणार आहे.

                         राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला धान उत्पादक जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

                     नवीन धान खरेदी सुरू होण्यापूर्वी या संदर्भात बैठकीतून चांगला तोडगा निघेल अशी आशा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली आहे.