दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आज आळंदी बंदची हाक दिली आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ.भावार्थ देखणेंचा समावेश आहे.
तसेच विकास ढगे पाटील, योगेश देसाई व लक्ष्मीकांत देशमुख या तीन विश्वस्तांना मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली, मात्र आळंदीतील स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. कार्तिक वद्य अष्टमी निमित्ताने सकाळी नऊ वाजता श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाल्यानंतर सर्व आळंदीकर ग्रामस्थांनी बंद पुकारला यावेळी सर्व आस्थापने यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली.
सकाळी 11 वाजता मोर्चा चाकण चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आळंदी देवस्थान मध्ये स्थानिकांना डावलल्याने, तसेच प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या आळंदीकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या. निषेध मोर्चा चाकण चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात आला यावेळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. सायंकाळी आठ वाजता पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. दुपार नंतर आळंदी बंद शिथिल करण्यात आला यावेळी सर्व आस्थापने सुरू झाली. भगवान श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज, भक्त पुंडलिक यांच्या पालख्यांचे आज आळंदीत आगमण होणार आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांची आळंदीत कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी आळंदीकरांनी घेतली आहे.