शिक्षक हवा घडणारा आणि घडविणारा.:- उमाकांत बांगडकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुरुजी .. — शिक्षक सातत्याने पारंगत व संवेदनशील असणे आवश्यक… — अभ्यासपुर्ण मार्गदर्शन,सर्व शिक्षकांनी,पालकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-

       विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत.शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार,नीतमूल्य,सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे.

             त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत.

               प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज,बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो.त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे.शिक्षकाने विद्यार्थ्यां मधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो,असे विचार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमाकांत बांगडकर गुरुजी यांनी व्यक्त केले.

                 विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात.मुलं कच्ची आहेत,ती अस्वच्छ राहतात,गैरहजर रहातात,गृहपाठ करीत नाहीत,दंगा करतात,अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात,विद्यार्थ्यां बाबतचा हा नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे जरुरीचे आहे असे अमुल्य मार्गदर्शन सुध्दा त्यांनी केले.. 

          समस्या असणारच,मात्र,कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे,त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे,प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.

              शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो.सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे.विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

            कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे.शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. 

             यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी,परिणामकारक,ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते.

            आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे.

            स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी,रंजक आणि सुलभपणे करू शकतो.

         विद् म्हणजे जाणणे,जो खूप जाणतो तो विद्वान.शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे.आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनीवन ज्ञान मिळवून,विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करील त्यांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. 

            या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग शिक्षकांनी चेतविला पाहिजे.शिक्षकाने वाचनप्रिय पाहिजे.स्वतःचा ग्रंथसंग्रह असणे आवश्यक आहे.आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. 

          त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हातळण्याची सूत्रे आपल्याला उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावे.कोणत्याही समस्येची उकल होण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता असते.शिक्षकाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे.विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या,बेशिस्तीच्या समस्या एकट्याने सोडविण्यापेक्षा सांघिक पद्धतीने सोडवाव्यात.

                 इतरांची मने जाणून घेण्यासाठी समस्या हाताळण्याचे नवे तंत्र हाती येऊ शकते.आपल्या समस्या,अडचणी यांच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये आसायला हवी.आपल्या लेखनातून,पथनाट्यातून,एकांकिका,कथा,गीते,कविता,लेख यातून शिक्षक आपल्या समस्या मांडू शकतात.यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते,त्यावर चर्चा होते आणि समस्यांचा चक्रव्यूहातून मार्ग शोधला जातो.

           आजचे युग हे संगणकाचे युग आहे.कुठल्याही नव्या परिवर्तनाच्या आणि संक्रमणामागच्या शक्तीचा उगम प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्राधिष्ठीत आहे.आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. 

            शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने,बिनचुकपणे,वेळेत आणि नियमांच्या आधीन राहून करायला हवे.बुद्धीवादी शक्ती या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी.त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनावे.

           अध्यापन करताना काही वेळेला शिक्षकांकडून नकळत राजकीय परिस्थितीबाबत बोलताना आपली वैयक्तिक मते विद्यार्थ्यांवर लादली जातात तर कधी अंधश्रद्धा निर्मूलनासारखे विषय मांडताना विद्यार्थ्यांच्या श्रद्धेला,भावनेला धक्का पोहचणारी विधाने होतात,हे शिक्षकांनी टाळावे. 

             अनेकवेळा विषयांचे स्ष्टीकरण करताना समाजाबद्दल अनेक नकारात्मक विचार मांडले जातात.जसे समाज खूप वाईट झाला आहे,आजकाल खरे बोलून जगताच येत नाही,पूर्वी जग चांगले होते,पण सध्याच्या कलीयुगात नैतिकता राहिली नाही,अशी मते मांडली जातात.

            काही अंश अशी अनुभूती समाजातून येतही असेल पण म्हणून ते काही विश्वसत्य नाही.त्यामुळे अशी विधाने टाळलेली बरी.मुलांच्या संस्कारक्षम मनावर त्याचा सखोल परिणाम होतो.मनात एक विकृत विचारसरणी रूजू लागते.समाजाकडे पर्यायाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. 

         म्हणून वर्गामध्ये अशी विधाने करणे काटेकोरपणाने टाळावे.शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता,आशावाद,मुलांना जगण्याचे बळ देतो.भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांनी मुळात स्वतःला घडविण्याची,उत्तुंगतेची आस प्रथम असली पाहिजे.

           जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी.स्वतःचे एक व्रतविधान हवे.

             मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो,आकाशाशी दोस्ती करायला शिकवितो तो खरा शिक्षक.नाही तर विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे येतात पण त्या मागची तर्कसंगती समजत नाही.मग आयुष्यात तो विसंगतीचाच पाठपुरावा करतो.विद्यार्थी कविता शिकतात पण त्यातील सौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

          विज्ञानाचे प्रयोग करतात पण त्यामागील विज्ञाननिष्ठा रुजत नाही.म्हणून शिक्षक हा मुळातच संवेदनशील हवा.शिक्षकांनी आपल्या समाजातील प्रतिमेला तडा जाणार नाही,आपल्या सुखदुखाचा, मानअपमानाचा लवलेशही विद्येच्या प्रांगणात प्रतिबिंबित होणार नाही याची दक्षता घेतली तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मतेने, उत्कटतेने पार पडेल.

       मुख्याध्यापकांसाठी आवश्यक असलेला शालेय पदविका अभ्यासक्रम मी पूर्ण केला.त्यावेळेला मी एक कृतीसंशोधन केले. त्याचा विषय होता ‘शिक्षक-पालक सभेमध्ये पालकांची उपस्थितीसंबंधी असलेली उदासिनता,कारणांचा शोध आणि उपाययोजना.’ यावर काही प्रयोगही केले. त्यांना यश आले,त्यातून अनेक निरीक्षणे नोंदविता आली.

          शिक्षक व पालक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यांच्यात समन्वय नसेल तर वेळ पडेल तसा एकमेकांना दोष दिला जातो.काही वेळेला विद्यार्थी शिक्षकांबद्दल घरी जाऊन खोटे सांगतात.त्यामुळे गैरसमजुती वाढतात.येथे शिक्षक-पालक यांच्यात नसलेल्या समन्वयाचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे आढळून येते.त्यामुळे पालकांचा शाळेची नियमित संपर्क असला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे दोघांनी मिळून शोधले पाहिजेत आणि चर्चेतून ते दूर करण्याचा प्रय़त्न केला पाहिजे. 

           पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातूनच उद्याची पिढी आणि राष्ट्राचे आधारस्तंभ घडणार आहेत असे सुस्पष्ट विचार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमाकांत बांगडकर गुरुजी यांनी मांडले.