ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- मक्कीटोला येथील पुल वाहून गेल्याने सध्या बंद असलेली साकोली तुमसर बससेवा एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी नुकतेच साकोली आगारप्रमुख यांना दिले आहे.
साकोली तुमसर मार्गावर मक्कीटोला येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते. परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला वळणमार्ग पूर्णपणे वाहून गेल्यामुळे त्या मार्गावर चालणारी साकोली तुमसर बससेवा बंद आहे.
उसगाव, सोनेगाव, मक्कीटोला, चांदोरी येथून अनेक विद्यार्थी एकोडी येथील कामाई करंजेकर विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, निर्धनराव वाघाये महाविद्यालय, सर्वांगीण शिक्षण विद्यालय तसेच साकोली येथील विविध विद्यालयात येणे जाणे करीत असतात.
परंतु सदर मार्ग बंद असल्याने साकोली तुमसर बससेवा बंद आहे. त्या मार्गावरील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी बस नसल्याने सलग पंधरा दिवसांपासून विद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याची दखल घेऊन एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी साकोली आगार प्रमुख सचिन आगरकर यांचेशी संवाद साधून निवेदन दिले.
त्या परिसरात तुमसर बस ही एकोडी , किन्ही, सालेभाटा, परसोडी, उसगाव , सोनेगाव, तुमसर या मार्गाने सुरू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी केली.